साखळीतील चोरी प्रकरणाचा डिचोली पोलिसांकडून छडा

तीन जणांना अटक : चोरीचा माल जप्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th June, 01:17 am
साखळीतील चोरी प्रकरणाचा डिचोली पोलिसांकडून छडा

डिचोली : साखळी बाजारातील श्री हनुमान मंदिराजवळ एका घराचा दरवाजा फोडून झालेल्या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात डिचोली पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक करून त्यांच्याकडून चोरीचा काही प्रमाणात माल जप्त करण्यात आला. चोरांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने मिळून २ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लांबवला होता.

हा चोरीचा प्रकार २५ एप्रिल रोजी रात्री घडला होता. साखळी बाजारातील श्री हनुमान मंदिराजवळ निखिल गुरूदास मेरकर यांच्या दुकानामागे असलेल्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरांनी आत प्रवेश केला होता. घरातील दागिने व पैसे लंपास केले होते.

या प्रकरणी डिचोली पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करून शोधमोहीम हाती घेण्यात आली. त्यात पोलीस उपनिरीक्षक रश्मीर परब मातोणकर यांनी अथक प्रयत्न घेऊन या प्रकरणात सहभाग असलेल्या विजापूर कर्नाटक येथील भिमा गोपाळ काळे (३६), हावेरी कर्नाटक येथील बाबाजान सलीम शेख (५०), सोलापूर महाराष्ट्र येथील जावेद उर्फ देविदास सुरेश पवार (४०) या तिघांना अटक केली. या तिघांनीही या चोरीची कबुली दिली असून संशयित बाबाजान सलीम शेख याच्याकडून एक सोनसाखळी जप्त करण्यात आली आहे.

तिन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. उत्तर गोवा पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता, डिचोली पोलीस उपअधीक्षक विल्सन डिसोझा, पोलीस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आकाश परवार अधिक तपास करीत आहेत.

२ लाख २५ हजारांचा ऐवज केला होता लंपास

घरातील कपाटात व इतर ठिकाणी शोधाशोध करुन आतील ७५ हजार रोख रक्कम, ८ ग्रॅम वजनाची व ७० हजार रुपयांची सोनसाखळी, पीएनजी ब्रँडचे ८ ग्रॅम वजनाचे व ८० हजार रुपयांचे सोन्याचे नाणे असे मिळून सुमारे २ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. 

हेही वाचा