डॉ. कल्पना महात्मे : जागृतीमुळे यंदा रुग्णसंख्या घटली
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात जानेवारी ते मे २०२४ च्या तुलनेत २०२५ च्या पहिल्या पाच महिन्यांत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या तिपटीहून कमी झाली आहे. जानेवारी ते मे २०२४ मध्ये राज्यात डेंग्यूचे ११६ रुग्ण आढळले होते. २०२५ मध्ये याच पाच महिन्यांत डेंग्यूचे ३३ रुग्ण आढळले. मागील वर्षी डेंग्यू हॉटस्पॉट असणाऱ्या भागात यंदा डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी खात्यातर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत. खात्यातर्फे करण्यात येणाऱ्या जागृतीमुळे यावर्षी डेंग्यूचे रुग्ण कमी आढळल्याची माहिती राष्ट्रीय वेक्टर बोर्न रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या उपसंचालिका डॉ. कल्पना महात्मे यांनी दिली.
राज्यात जानेवारी २०२५ मध्ये ७, फेब्रुवारीमध्ये ९, मार्चमध्ये ७ रुग्ण, एप्रिलमध्ये ६, तर मेमध्ये ४ रुग्ण आढळले होते. मे महिन्यात म्हापसा, कोलवाळ, कासारवर्णे आणि मडगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला होता. खात्यातर्फे स्थलांतरित कामगार वस्तीमधील किंवा बांधकाम प्रकल्पात राहणाऱ्या कामगारांच्या परिसरात तपासणी केली जात आहे. अशा ठिकाणी पाणी उघड्यावर साठवून ठेवण्यात येते. यात डासांची पैदास होऊन डेंग्यू पसरण्याची शक्यता असते. याशिवाय घरातील कुंड्यांच्या खाली, फ्रीजखाली पाणी साचूनही डेंग्यूच्या डासांचा फैलाव होण्याची शक्यता असते.
राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. अशावेळी सखल भागात पाणी साचून डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असते. खात्यातर्फे हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी स्वच्छता, औषध फवारणी, डासांची वस्ती नष्ट करणे अशी विविध कामे सुरू आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे यंदा डेंग्यू रुग्णसंख्या कमी झाली आहे. कचरा साफ करणे, उघड्यावर टायर न टाकणे, साठवलेले पाणी झाकून ठेवणे, परिसराची स्वच्छता राखणे या गोष्टी केल्यास डेंग्यूचा फैलाव कमी होईल, असे डॉ. महात्मे यांनी स्पष्ट केले.