बस्तोडा हल्ला प्रकरणातील तपास अधिकारी ताबडतोब बदला : ॲड. कार्लुस फेरेरा

हल्ल्यातील संशयित भाजप सदस्य असल्याने तपासावर परिणाम

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th June, 05:03 pm
बस्तोडा हल्ला प्रकरणातील तपास अधिकारी ताबडतोब बदला : ॲड. कार्लुस फेरेरा

पणजी : बस्तोडा येथे झालेल्या हल्ला प्रकरणातील एक संशयित भाजप सदस्य असल्याने तपास संथगतीने होत आहे. संशयित व तपास अधिकाऱ्याचे जवळचे संबंध असल्याने तपास अधिकारी ताबडतोब बदलण्याची मागणी हळदोणेचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. यावेळी त्यांच्या समवेत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर उपस्थित होते.

पार्किंग वरून झालेल्या वादानंतर गरोदर महिलेवर हल्ला करण्याचा प्रकार हा गंभीर आहे. कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असले तरी तपासाची गती संथ आहे. तपास अधिकारी पीएसआय बाबलो परब याचे संशयिताशी जवळचे संबंध आहेत. निष्पक्ष तपासासाठी तपास अधिकारी बदलण्याची गरज आहे. हल्ल्यातील एक संशयित भाजपचा सदस्य असल्याने तपासात हस्तक्षेप तसेच दबाव आणला जात आहे. त्यामुळे संशयिताचा गॉडफादर कोण? असा प्रश्न निर्माण होत असल्याचे ॲड. कार्लुस फेरेरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भाजपच्या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडली
गरोदर महिलेवर झालेला हल्ला हा गंभीर प्रकार असून राज्यात महिला सुरक्षित नसल्याचे यातून सिद्ध होते. भाजप सरकाराच्या काळात राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली असून सरकारचे नियंत्रण नसल्याचा आरोप प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यानी केला.