सरपंच पदाची लॉटरी! मात्र केवळ नऊ दिवसांतच खुर्ची हातातून निसटली

मये सरपंच, उपसरपंचांवरील अविश्वास ठराव मंजूर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th June, 03:46 pm
सरपंच पदाची लॉटरी! मात्र केवळ नऊ दिवसांतच खुर्ची हातातून निसटली

डिचोली : मये सरपंच कनिवी कवठाणकर व उपसरपंच वर्षा गडेकर यांच्या विरोधात सात सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव आज मंजूर करण्यात आला. त्यामुळे सरपंचपद केवळ नऊ दिवसांचे ठरले. मये पंचायतीत गेल्या आठवड्यात एका नाट्यमय घडामोडीत कनिवी कवठणकर यांना सरपंच पदाची लॉटरी लागली होती. सरपंच पदासाठी वासुदेव गावकर व कनिवी कवठणकर यांनी अर्ज दाखल केले होते.

यावेळी झालेल्या मतदानात दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी पाच पाच मते मिळाली तर एक मत तांत्रिक कारणास्तव बाद ठरल्याने लॉट्सच्या माध्यमातून सरपंच पदाची निवड करताना कनिवि कवठणकर यांनी बाजी मारली होती. त्यानंतर अवघ्या दोनच तासात सात पंच सदस्यांनी कनिवी कवठणकर यांच्या विरोधात अविश्वास ठरवाची नोटीस बजावली. तसेच त्याच दिवशी उपसरपंच वर्षा गडेकर यांच्या विरोधातही अविश्वास ठराव दाखल केला होता.

मये पंचायत मधील एकूण ११ पंचायत सदस्य असून सीमा आरोंदेकर, विद्यानंद कारबोट, वासुदेव गावकर, विशांत पेडणेकर, विनिता पोळे, कृष्णा चोडणकर, वर्षा गडेकर, सुवर्णा चोडणकर, दिलीप शेट, सुफला चोपडेकर हे सदस्य उपस्थित होते. ठराव आठ विरुद्ध तीन व सात विरुद्ध चार असा संमत झाला असून पुढील आठवड्यात सरपंच, उपसरपंच निवड होणार आहे.