विश्वजीत राणे : राज्यात तीन महिन्यांत ५ लाख वृक्षांची लागवड
मडगाव : राज्यात पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत विविध ठिकाणी सुमारे पाच लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्याशिवाय पालिका क्षेत्रांतही जागा उपलब्ध असल्यास वृक्षारोपण केले जाईल व त्याची निगा जीसुडा घेईल. तसेच २५० पेक्षा जास्त उंच इमारतींना व्हर्टिंकल फॉरेस्ट केल्याशिवाय कोणत्याही प्रकारची मंजुरी मिळणार नाही, अशी माहिती मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.
मडगाव येथील सोनसडो कचरा यार्डाच्या ठिकाणी कमी जागेत दाट जंगल उभारणीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याची सुरुवात नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांच्यासह आमदार दिगंबर कामत, नगराध्यक्ष दामू शिरोडकर व नगरसेवकांच्या उपस्थितीत झाली. यावेळी वन खाते, नगरनियोजन खात्याचे अधिकारीही उपस्थित होते.
गोवा हे लहान राज्य असले तरीही पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात सुमारे पाच लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे. ही झाडे लोकेशनसह कुठे लावली याची माहिती मिळू शकेल. याशिवाय पालिका क्षेत्रात ज्याठिकाणी जागा उपलब्ध असेल त्याठिकाणी पालिका मंडळांना सोबत घेत वृक्षारोपण केले जाईल. जीसुडाच्या माध्यमातून त्यांची देखभाल केली जाईल, पालिकांवर कोणत्याही प्रकारचा भार येणार नाही, असे मंत्री राणे यांनी सांगितले.
इमारतींची उंची, पार्किंगची सोय व इतर सुविधांबाबत निर्णय
२५० एफएसआय व त्यापेक्षा जास्त एफएसआय असलेल्या इमारतींवर (व्हर्टीकल फॉरेस्ट) वृक्षारोपणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ते केल्याशिवाय कोणत्याही प्रकल्पाला मंजुरी मिळणार नाही. याची अधिसूचना पुढील गुरुवारपर्यंत येईल. त्याशिवाय या उंच इमारतींचा पांढरा रंग देण्याची गरज आहे. त्यामुळे तापमान योग्य राखले जाते. याबाबत सिंगापूरमध्येही वैज्ञानिक अभ्यासाअंती उपाययोजना झालेल्या आहेत. याशिवाय इमारतींची उंची, पार्किंगची सोय व इतर सुविधा यासाठी आणखी काही निर्णय घेण्यात येणार आहेत. यासाठी उंचाबाबत निर्णय घेण्यात येईल. ३०० एफएसआयपेक्षा जास्त उंची असणार नाही पण सात ते आठ मजल्यांच्या इमारतींना याचा फायदा होणार आहे, असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.
शहरी भागात घनदाट जंगल उभारणीची संकल्पना
घन जंगलासाठीच्या पहिल्या प्रकल्पासाठी नगरनियोजन व वन खात्याने सोनसडो यार्डाची निवड केलेली आहे. हे पूर्ण झाल्यानंतर यामागे असलेला कचराही दिसून येणार नाही. मडगावपासून या प्रकल्पाची सुरुवात होत असून शहरी भागात अशाप्रकारे घनदाट जंगल उभारणी संकल्पना अस्तित्वात येणार आहे. याला सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे, असे आमदार दिगंबर कामत म्हणाले.
नोकरीसाठी एक रुपया घेतलेला नाही : मंत्री राणे
नोकरीसाठी पैसे घेतले जात असल्याचा एक ऑडिओ व्हायरल होत असल्याबाबत मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले की, आम्ही एकाही नोकरीसाठी एक रुपया घेतलेला नाही. समाजमाध्यमांवर काहीही टाकण्यात येत असते. कुणाकडे पुरावे असल्यास त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करावा.