पर्वरी येथील अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू

ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st June, 11:56 pm
पर्वरी येथील अपघातातील जखमी वृद्धाचा मृत्यू

म्हापसा : पर्वरी येथील चोगम रस्त्यावर ट्रकच्या धडकेत जखमी झालेल्या गोपाल प्रसाद (६८, रा. बस्तोडा व मूळ मध्यप्रदेश) या वृद्ध इलेक्ट्रिक स्कुटरस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालक अजय नेरूलकर (रा. नेरूर, महाराष्ट्र) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अपघात गुरूवार, दि. २९ मे रोजी सकाळी १०.१८ वाजण्याच्या सुमारास पर्वरीतील युनायटेड बेनेटन शोरूमजवळ घडला होता. तर, जखमीचे शनिवार दि. ३१ मे रोजी रात्री गोमेकॉत उपचारादरम्यान निधन झाले.

संशयित आरोपी एमएच ०७ एटी ६५५२ क्रमांकाचा ट्रक घेऊन चोगम रस्त्यावर येत होता. रस्त्यावर गाडीने वळण घेतले तेव्हा समोरील इलेक्ट्रिक स्कुटरला या ट्रकची धडक बसली. त्यामुळे गोपाल हे स्कुटरसह रस्त्यावर कोसळले व गंभीर जखमी झाले. लगेच त्यांना गोमेकॉत उपचारार्थ दाखल करण्यात आले. तिथे त्यांचा दोन दिवसांनी मृत्यू झाला.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयराम हळदणकर यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संशयित ट्रक चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन हाकून वाहनस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली भा.न्या.सं.च्या १०६(१) कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रतिक तुळसकर हे करीत आहेत.