मदतीला धावलेल्या कामगारासह गोदाम मालक जखमी
म्हापसा : आसगाव येथील एका इलेक्ट्रिक गोदाममध्ये जेवण बनवताना आग लागली. आग विझवण्यासाठी मालकाच्या मदतीला धावून आलेला चंद्रशेखर चव्हाण (३५, रा. मूळ महाराष्ट्र) याच्यासह गोदाम मालक तैमीर (रा. मूळ ओडिशा) हे जखमी झाले.या आगीमुळे गोदामातील सुमारे ३० हजा रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले.
ही दुर्घटना रविवार, १ रोजी दुपारी २.२० वाजण्याच्या सुमारास घडली. आसगाव येथील गणपती मंदिराजवळील गोदामाला ही आग लागली. या छोटेखानी गोदामामध्ये तैमीर हा गोदाम मालक जेवण बनवत होता. त्यावेळी गॅस शेगडीतून ठिणगी उडाली आणि तेथील इलेक्ट्रिक वस्तूंना आग लागली. तैमीर याने प्रसंगावधान राखत गॅस सिलिंडर बाहेर काढला.
या गोदामाच्या जवळच ५० मीटरवर तैमीर याचे इलेक्ट्रिक वस्तू विक्रीचे दुकान आहे. या दुकानात चंद्रशेखर चव्हाण हा कामाला होता. आगीचा प्रकार त्याच्या निदर्शनास येताच त्याने फायर एस्टींग्यूशरने आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आगीचा भडका उडाला आणि दोघेही जखमी झाले.
जखमी चंद्रशेखर याला रुग्णवाहिकेतून म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचारार्थ दाखल केले. तर, तैमीर याने इस्पितळात जाण्यास नकार दिला. घटनेचा पंचनामा हणजूण पोलिसांनी केला.
आग लागून ३० हजारांच्या मालाचे नुकसान
इलेक्ट्रिक गोदामाला आग लागून ३० हजारांचा माल जळाला. तर, इतर साहित्य अग्निशमन दलाला वाचवण्यात यश आले. म्हापसा अग्निशमन दलाचे उपअधिकारी प्रकाश कान्नाईक यांच्या नेतृत्वाखालील स्वपेश कळंगुटकर, भगवान पाळणी, श्रीनाथ नर्से, सिद्धेश शेट व अक्षय सावंत या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली.