कोलवात कॅफे रेस्टॉरंटला आग लागून लाखोंचे नुकसान

आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
31st May, 11:34 pm
कोलवात कॅफे रेस्टॉरंटला आग लागून लाखोंचे नुकसान

मडगाव : कोलवा समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील ‘वॉव मोमो’ या कॅफे रेस्टॉरंटला आग लागली. अग्निशामक दलाकडून आगीवर नियंत्रण आणण्यात आले असून या दुर्घटनेत सुमारे ५० ते ६० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती दुकान मालकाने दिली.

कोलवा येथे समुद्र किनाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर बास्किन रॉबिन दुकानाच्या पुढील परिसरात ‘वॉव मोमो’ या कॅफेकम रेस्टॉरंट दुकानाला आग लागण्याची घटना शनिवारी सकाळी घडली. सकाळी पावणेसहा वाजता दुकान मालक नीलेश पंचवाडकर यांना दुकानातून धूर येत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत दुकानाचे शटर उघडले असता दुकानात मोठी आग लागल्याचे दिसून आले. आगीने पेट घेतला असल्याने दुकानातील कोणतेही सामान बाहेर काढण्यास वेळ मिळाला नाही. मडगाव अग्निशामक दलाला आग लागल्याची माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे एक तास परिश्रम घेत पाण्याचा मारा केल्यानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात आले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आग लागण्याचे नेमके कारण अजूनही समजू शकले नाही. मडगाव अग्निशामक दलाकडून अजूनही नुकसानीचा आकडा काढण्यात आलेला नाही.

दुकान मालक नीलेश पंचवाडकर यांनी सांगितले की, मागील अडीच वर्षांपासून हे रेस्टॉरंट सुरू करण्यात आले होते. आगीमुळे कोणतेही साहित्य वाचू शकलेले नाही.

दुकानाच्या वरील बाजूस असलेल्या डेंटल क्लिनिकलाही आगीची झळ पोहोचली आहे. आग लागलेल्या दुकानाचा विमा उतरवण्यात आला असल्याची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांकडून देण्यात आली.

फर्निचर, डीप फ्रिजर जळून खाक

आग लागलेले दुकान नीलेश पंचवाडकर यांच्या मालकीचे असून त्यांनी भाडेतत्त्वावर हे दुकान वास्कोतील शॉन मोराईस यांना चालवण्यासाठी दिले होते. या आगीच्या घटनेत दुकानातील फर्निचर, टेबल्स, तीन डीप फ्रिजर, दुकानाचे शटर्स यासह इतर साहित्य जळून खाक झाले.