पोलीस बंदोबस्तात नोंदवले आक्षेप
पणजी : टॅक्सी चालक संघटनांनी राज्यात 'ॲप अग्रिगेटर' नकोच अशी भूमिका कायम ठेवली. सोमवारी या अधिसूचनेविरोधात आक्षेप नोंदवण्यासाठी राज्यभरातील टॅक्सी चालकांनी जुंता हाऊस येथे गर्दी केली. वाहतूक खात्याने आक्षेप स्वीकारण्यासाठी पाच विशेष बूथ सुरू केले होते. यावेळी या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हा परिसर तसेच पणजी पोलीस स्थानक परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली होती. मात्र टॅक्सी चालकांनी आंदोलन करण्यास नव्हे तर केवळ आक्षेप नोंदविण्यास आल्याचे स्पष्ट केले.
सोमवारी ॲप अग्रिगेटरबाबत राज्यातील विविध टॅक्सी संघटनांनी मतदार संघांच्या आमदारांना भेट देऊन या धोरणाला विरोध केला. दुपारी १२.३० नंतर राज्यभरातील टॅक्सी मालक जुंता हाऊस परिसरात जमू लागले. दुपारनंतर आक्षेप नोंदवण्यासाठी मोठी रांग लागली होती. 'गोव्यातील सर्व व्यवसाय स्थानिकांच्या हातून गेले आहेत. टॅक्सी ॲपच्या माध्यमातून हा व्यवसाय खाजगी कंपन्यांना देण्याचा डाव आहे. हा व्यवसाय आमच्या हातातून गेला तर आम्ही रस्त्यावर येणार आहोत. यासाठी आमचा याला विरोध कायम आहे,' असे टॅक्सी संघटनेचे योगेश गोवेकर यांनी सांगितले.
चेतन कामत यांनी सांगितले की, सरकारने अधिसूचनेबाबत आक्षेप देण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. यानुसारच आज आम्ही आक्षेप नोंदवण्यासाठी आलो होतो. आंदोलन करणे किंवा दंगा करणे हा आमचा हेतू नव्हता. त्यामुळे येथे एवढा पोलीस बंदोबस्त ठेवण्याची गरज नव्हती. कदाचित सरकार आम्हाला घाबरत असावे. आम्ही लोकशाही मार्गाने विरोध करत आहोत. पुढील काही दिवसांत दहा हजाराहून अधिक टॅक्सी चालक ॲपच्या विरोधात आक्षेप नोंदवणार आहेत. यामध्ये रेंट ए कारचा मुद्दा आणून आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे.