काँग्रेस नेते अॅड. जितेंद्र गावकर : आमदार आर्लेकरांच्या राजीनाम्याची मागणी
पत्रकारांना माहिती देताना अॅड. जितेंद्र गावकर. सोबत इतर. (निवृत्ती शिरोडकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पेडणे : माजी आमदार बाबू आजगावकर यांनी मालपे पेडणे येथील जागेत पेट्रोल पंप घातला आणि उर्वरित जागेत पर्यटक बोटींचा भंगार अड्डा बनवला. त्याच धर्तीवर पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी कासारवर्णेतील प्राथमिक आरोग्य केंद्रात राज्यातील रुग्णवाहिका आणून भंगार अड्डा बनवला आहे. आमदार आर्लेकर यांना या आरोग्य केंद्राकडे वेळ द्यायला वेळ नसल्यास त्यांनी राजीनामा द्यावा, असे प्रतिपादन काँग्रेसचे पेडणेतील नेते तथा काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. जितेंद्र गावकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
यावेळी त्यांच्यासोबत पेडणे मतदारसंघातील काँग्रेसचे गटाध्यक्ष कृष्णा नाईक, मोपा विमानतळ जन संघटनेचे निमंत्रक उदय महाले, संजय आरोस्कर आदी उपस्थित होते. पेडणे मतदारसंघातील कासारवर्णे ग्रामपंचायत क्षेत्रातील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्राची दयनीय अवस्था झाली असून आमदार आर्लेकर जनतेच्या आरोग्याशी खेळत आहेत. आरोग्य केंद्रातील सार्वजनिक संडास फुटला असून संडासाची साफसफाई करणे अवघड जाते. लाकडी छप्पराच्या कोपर्यातील लाकूड मोडून पावसात भिजत आहे. दर्शनी भागातील इमारतीचे छपराचे काँक्रिट कोसळून पडले आहे. कर्मचारी वेळेवर कामावर येत नसल्याने आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या रुग्णांना रक्त तपासणीसारख्या क्षुल्लक कारणांसाठी ताटकळत थांबावे लागते.
काँग्रेसचे गटाध्यक्ष कृष्णा नाईक म्हणाले की, कासारवर्णेतील प्राथमिक आरोग्य केंद्राची दुर्दशा झाली असून आमदार आर्लेकरांचे दुर्लक्ष झाले आहे. उदय महाले म्हणाले की, भंगार अड्ड्यामुळे लोकांचे आरोग्य बिघडते. प्रत्येक वेळी सरकारला आठवण करून द्यावी लागते, हे लज्जास्पद आहे.
पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा इशारा
काही वर्षांपासून कासारवर्णे येथील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णवाहिकांसाठी भंगार अड्डा बनला आहे. येथील भंगार रुग्णवाहिका हटवल्या नाहीत तर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येईल, असा इशाराही अॅड. जितेंद्र गावकर यांनी दिला.