देशभरात १.७५ लाख आयुष्मान आरोग्य मंदिर : नड्डा

के.एल.ई.चा १५ वा पदवीदान समारंभ भव्यदिव्य वातावरणात


04th June, 01:11 am
देशभरात १.७५ लाख आयुष्मान आरोग्य मंदिर : नड्डा

डॉ. करुमुडी प्रत्युषा यांना सर्वाधिक तीन सुवर्णपदके प्रदान करताना केंद्रीय मंत्री डॉ. नड्डा. सोबत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, डॉ. कोरे, डॉ. गंगणे आणि इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
बेळगाव : आमचे उद्दिष्ट केवळ उपचारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक, उपशामक आणि पुनर्वसनात्मक आरोग्यसेवा पुरवण्याचे आहे. देशभरात १.७५ लाख आयुष्मान आरोग्य मंदिर कार्यरत आहेत. गेल्या १० वर्षांत देशात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ७८० पर्यंत वाढली आहे, तसेच एमबीबीएस जागांमध्ये १३० टक्के आणि पोस्ट ग्रॅज्युएट जागांमध्ये १३८ टक्के वाढ झाली आहे. शिकण्याची प्रक्रिया कधीही थांबवू नका. ज्या क्षणी वाटते की आपण सर्व काही शिकलो आहोत, तिथेच वैयक्तिक वाढ थांबते, असे मार्गदर्शन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केले.
के.एल.ई. अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च (मान्यताप्राप्त विद्यापीठ), बेळगावचा १५ वा पदवीदान समारंभ मंगळवारी के.एल.ई. शताब्दी समारंभ भवन, जे.एन.एम.सी. कॅम्पस, बेळगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला. समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. जगत प्रकाश नड्डा उपस्थित होते. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी के.एल.ई. संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे आणि त्यांच्या टीमचे शैक्षणिक व आरोग्यसेवेतील योगदानाबद्दल विशेष कौतुक केले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन एम. गंगणे यांनी विद्यापीठाचा २०२४-२५ वर्षाचा अहवाल सादर केला. या समारंभात टाटा मेमोरियल रुग्णालय, मुंबईचे सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागाचे प्राध्यापक व उपसंचालक प्रा. डॉ. शैलेश श्रीखंडे यांना सन्माननीय डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. समारंभास कुलपती डॉ. प्रभाकर कोरे, नोंदणी अधिकारी डॉ. एम. एस. गणाचारी, परीक्षा नियंत्रक डॉ. चंद्रा एस. मेटगुड यांची उपस्थिती होती.
समारंभात एकूण १,८४४ पदव्या प्रदान
या समारंभात एकूण १,८४४ पदव्या विविध वैद्यकीय शाखांमध्ये प्रदान करण्यात आल्या. यामध्ये ४० पीएच.डी., २९ पोस्ट डॉक्टरल पदव्या (डीएम/एम.सीएच.), ६६० पदव्युत्तर पदव्या, १,०८० पदवी पदव्या, ९ पदव्युत्तर डिप्लोमा, ११ डिप्लोमा आणि ४ फेलोशिप पदव्या यांचा समावेश होता. याशिवाय २८ मुली आणि ७ मुलांना एकूण ४६ सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.