उद्यापासून सुरू होणार प्रवेशासाठीचे काउंसलिंग
पणजी : राज्यातील पदवी नंतरच्या बी. एड. अभ्यासक्रम प्रवेशासाठी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली असून प्रवेशाचे काउंसिलिंग उद्या ४ जून ते ६ जून या कालावधीत होणार आहे.
२८ मे रोजी हंगामी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती. हंगामी गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर उमेदवारांकडून हरकती मागविण्यात आल्या होत्या. या हरकतींचा विचार करण्यात आल्यानंतर आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.
गुणवत्ता यादी dhe.goa.gov.in या संंकेतस्थळावर उपलब्ध आहे. पर्वरी येथील एससीईआरटी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील परिषदगृहात काउंसिलिंग होणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत काउंसिलिंग चालणार आहे.
उद्या ४ रोजी सर्वसामान्य गटातील प्रवेशाचे काउंसिलिंग होईल. ५ व ६ जून रोजी एससी, एसटी, ओबीसी, इडब्लूएस या गटातील प्रवेशाचे काउंसिलिंग होईल. बी. एड.च्या ३२० जागांसाठी १०१८ प्रवेश अर्ज आले होते. उपलब्ध जागांच्या तीन पटींहून जास्त अर्ज आल्याने प्रवेशासाठी चुरस होती.
पदवी नंतरच्या दोन वर्षांच्या बी. एड. अभ्यासक्रमासाठी २५ एप्रिलपासून अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाला होता. ज्या विद्यार्थ्यांनी पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिली आहे. त्यांनी सुद्धा अर्ज केलेले आहेत. राज्यात तीन महाविद्यालयामध्ये बी. एड. (पदवी नंतरचा) अभ्यासक्रम आहे.
आल्तिनो येथील निर्मला इन्स्टिट्यूटमध्ये १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. फर्मागुडी - फोंडा येथील जीव्हीएम्स व पीईएस महाविद्यालयामध्ये प्रत्येकी ११० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. तिन्ही महाविद्यालयांमध्ये मिळून ३२० जागा आहेत. यातील काही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.