राज्यात मेमध्ये सरासरी २५.९८, तर जूनच्या चार दिवसांत २.१८ इंच पाऊस

यंदा एक महिनाआधीच २५ इंचाची सरासरी पूर्ण


05th June, 12:52 am
राज्यात मेमध्ये सरासरी २५.९८, तर जूनच्या चार दिवसांत २.१८ इंच पाऊस

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : यंदा राज्यात २५ मे रोजी मान्सूनचे आगमन झाले. मान्सूनपूर्व तसेच मान्सून सुरू झाल्यावर काही दिवस पावसाने जोर धरला होता. राज्यात १ ते ३१ मे दरम्यान सरासरी २५.९८ इंच पावसाची नोंद झाली होती. यातील २५.०९ इंच पाऊस २० ते २९ मे या दहा दिवसांच्या काळातच पडला. १ ते ४ जून दरम्यान सरारारी २.१८ इंच पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात मान्सूनचे आगमन साधारणपणे ५ जूनला होते. यंदा मान्सून ११ दिवस आधी दाखल झाला. मागील वर्षी मान्सून ४ जून रोजी दाखल झाला होता. १ ते ४ जून २०२४ मध्ये राज्यात सरासरी ०.५ इंच पावसाची नोंद झाली होती. मागील वर्षी २४ जून रोजी पावसाने २५ इंचाची सरासरी पूर्ण केली होती. यंदा जवळपास एक महिना आधी २५ इंचाची सरासरी पूर्ण झाली. सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. बुधवारी राज्यात किरकोळ पावसाची नोंद झाली. बहुतेक ठिकाणी ऊन-पावसाचा खेळ होता. पणजीत कमाल ३२ अंश व किमान २५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
राज्यात २४ तासांत सरासरी २०.२ मिमी पाऊस
हवामान खात्याने राज्यात ५ ते १० जून दरम्यान राज्यात किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३३ अंश, तर किमान तापमान २६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. २४ तासांत राज्यात सरासरी २०.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यादरम्यान काणकोणमध्ये ३९.२ मिमी, पेडण्यात २५.६ मिमी पावसाची नोंद झाली. राज्यात १ ते ४ जून दरम्यान सरासरी २.१८ इंच पावसाची नोंद झाली आहे.