विद्यार्थ्यांचे स्वागत : काही हायस्कूलमध्ये केले औक्षण
साखळीतील लक्ष्मीबाई संझगिरी स्मृती हायस्कूलमध्ये पहिलीच्या वर्गात आलेले विद्यार्थी.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
साखळी : उन्हाळ्याची दीर्घ सुट्टी संपल्यानंतर बुधवारी सुरू झालेल्या शालेय वर्षाला साखळीतील अनेक शाळा, हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सुट्टीनंतर विद्यार्थ्यांनीही उत्साहात शाळा हायस्कूलमध्ये प्रवेश केला. शिक्षिकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून, फुलांचे प्रोक्षण करून स्वागत केले.
मे महिन्याची सुट्टी घालवल्यानंतर विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने शाळेत प्रवेश केला. यामध्ये अनेक प्राथमिक शाळांमध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांनी प्रथमच मोठ्या उमेदीने नव्या मित्रांसह शाळेचा पहिला दिवस अनुभवला. या नवीन विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी व वरिष्ठ विद्यार्थ्यांनीही जोरदार स्वागत केले.
सकाळी शाळा भरताना पावसानेही जोरदार उपस्थिती लावली. त्यामुळे अनेकांना छत्र्या व रेनकोट परिधान करूनच शाळा गाठावी लागली. पाऊस सुरू झाल्यानंतर अनेकांनी चारचाकी वाहने बाहेर काढली. परिणामी शाळांच्या परिसरामध्ये वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याचे दिसून आले. या कोंडीवर नियंत्रण आणताना वाहतूक पोलिसांची दमछाक झाली.
सुमारे दीड महिन्यानंतर साखळीतील रस्ते विद्यार्थ्यांनी गजबजलेले दिसून आले. बाजारांमध्येही शालेय वस्तू, पुस्तके खरेदी करण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी गर्दी केल्याचे चित्र दिसत होते.