पालकांमध्ये गोंधळ : पंचायतीच्या इमारतीत तात्पुरती वर्गांची व्यवस्था
ताळगाव येथील सरकारी प्राथमिक शाळेचे सुरू असलेले दुरुस्ती काम. (समीप नार्वेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात सर्वत्र शाळा सुरू झाल्या असताना, ताळगावमधील सरकारी प्राथमिक शाळा दुरुस्तीमुळे बंद ठेवण्यात आली आहे. पालकांना याची कोणतीही पूर्वसूचना न मिळाल्याने सकाळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. वर्ग बंद आढळल्याने अनेक पालक आपल्या मुलांसह माघारी फिरले.
शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारतीचे काम सुरू असून, ते वेळेत पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शाळेचे वर्ग तात्पुरते ताळगाव पंचायतीच्या ‘कासा दो पोव्हो’ इमारतीत हलवण्यात आले आहेत. या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना स्थानिक सामाजिक कार्यकर्त्या सिसिल रोड्रिग्स यांनी प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, शाळा बंद ठेवण्यापूर्वी पालकांना कळवणे आवश्यक होते. शिवाय, विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था आधीच करणे गरजेचे होते. यातून शिक्षण खात्याचे नियोजनशून्य धोरण आणि विद्यार्थ्यांविषयीची अनास्था स्पष्टपणे दिसून येत आहे, असा आरोपही त्यांनी केला.