नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांसमोर वाचला समस्यांचा पाढा

कारवाईचे निर्देश : म्हापसा प्रशासकीय अधिकारी, नगरसेवकांसोबत बैठक


04th June, 01:09 am
नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांसमोर वाचला समस्यांचा पाढा

नगरसेवक व अधिकार्‍यांच्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत उपसभापती जोशुआ डिसोझा, जिल्हाधिकारी अंकित यादव, नगराध्यक्ष प्रिया मिशाळ व इतर. (उमेश झर्मेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : पावसामुळे शहरात काही ठिकाणी निर्माण झालेली पूरसदृश परिस्थिती, कचरा व्यवस्थापन, रखडलेला मलनिस्सारण प्रकल्प, तसेच प्रभागनिहाय प्रलंबित प्रश्नांचा पाढा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमोर नगरसेवकांनी वाचला. मंगळवारी सायंकाळी उशिरा मुख्यमंत्र्यांनी म्हापसा नगरपालिका कार्यालयात पालिका मंडळ व प्रशासकीय अधिकार्‍यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी उपसभापती जोशुआ डिसोझा, नगराध्यक्ष प्रिया मिशाळ, उपनगराध्यक्ष प्रकाश भिवशेट, सर्व नगरसेवक, जिल्हाधिकारी अंकित यादव (आयएएस), अतिरिक्त जिल्हाधिकारी पुंडलिक खोर्जुवेकर, पालिका, वीज, साबांखा, पेयजल, पोलीस व इतर खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी पालिका मुख्याधिकार्‍यांना पालिकेकडून व्यापार परवाना व कर गोळा करण्याच्या प्रक्रियेबाबत आवश्यक निर्देश दिले. जलवाहिनी दुरुस्तीच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखवणार्‍या कनिष्ठ अभियंत्यांवर कारवाईचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी बैठकीदरम्यान दिले.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नगरसेवक अ‍ॅड. शशांक नार्वेकर यांनी सांगितले की, शहरातील कचरा व्यवस्थापन किंवा पूरसदृश परिस्थितीमुळे लोकांना जो त्रास झाला, याबाबतची माहिती आम्ही मुख्यमंत्र्यांना दिली. हे विषय पालिका मंडळाच्या चुकीच्या व सुस्त प्रक्रियेमुळे निर्माण झाले. गटार उपसा किंवा नाल्यांची साफसफाई ही पावसाळ्यापूर्वी झाली नाही. आता मुख्यमंत्र्यांनी शहरातील कचरा व्यवस्थापनाची सूत्रे गोवा घन कचरा महामंडळाकडे दिली आहेत. म्हापशात बांधलेले नाले सदोष आहेत. काँक्रिटीकरणामुळे याचा परिणाम पाण्याच्या प्रवाहावर होत आहे, अशा काही कैफियती नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अधिकार्‍यांसोबत बंद दाराआड चर्चा करून संबंधितांना आवश्यक सूचना व निर्देश दिले आहेत, असे नार्वेकर यांनी सांगितले.
उपसभापती जोशुआ डिसोझा म्हणाले की, म्हापशातील विषयांबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली आहे. येत्या काही दिवसांत बदल दिसेल. आसगाव पठारावर कचरा टाकण्यास मनाई असल्याने कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावण्यासंदर्भात पालिकेवर किंचित ताण आहे. मुख्यमंत्री तसेच लोकांच्या सहकार्याने हा विषय सोडविला जाईल.
रस्त्याच्या बाजूला कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई : मुख्यमंत्री
म्हापशात कचर्‍याची समस्या आहे. हा विषय मार्गी लावण्यासाठी गोवा घन कचरा खात्याकडे तात्पुरती जबाबदारी दिली आहे. अवकाळी पावसामुळे शहरात पूरसदृश स्थिती आली होती. याचा दोष सरकारला देऊन चालणार नाही. कारण काहींनी गटार आणि नाल्यावर बांधकामे केली आहेत. याला पालिका तितकीच जबाबदार आहे. पालिकेकडून वेळीच हस्तक्षेप झाला नाही. अभियंत्यांना प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन कामे करण्याचे निर्देश दिले आहेत. रस्त्यांच्या बाजूला कचरा आणून टाकणार्‍या लोकांवर पोलीस कारवाई करतील. कचर्‍याचे वर्गीकरण करून दिल्यास कचरा व्यवस्थापनाला मदत मिळेल व हा प्रश्न मार्गी लागेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी म्हणाले.