९ प्रवासी किरकोळ जखमी, दोघांना मडगावला हलविले
काणकोण : रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मडगावहून कर्नाटकातील कुमठा येथे जाणाऱ्या कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसने काणकोण गुळे येथे दिशादर्शक फलकाला धडक दिली. या अपघातात ९ प्रवासी किरकोळ जखमी झाले. तर, जखमी झालेल्या दोघांना मडगाव येथे रुग्णालयात पाठविण्यात आले.
गुळे येथे दिशादर्शक फलकाला बसने धडक दिल्याने बसच्या डाव्या बाजूच्या काचा फुटल्या. फुटलेल्या काचा बसमधील प्रवाशांच्या अंगावर पडल्या. बसने अचानक दिशादर्शक फलकाला धडक दिल्याने काही प्रवाशांच्या डोक्याला तसेच तोंडाला जखमा झाल्या. किरकोळ जखमी झालेले प्रवासी दुसरी बस पकडून आपल्या कारवार येथील निवासस्थानी गेले.
काणकोण पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्याला इस्पितळात पाठविल्याचे काणकोण पोलिसांनी सांगितले.