सुरक्षारक्षकाच्या खूनप्रकरणी संशयितास सात दिवस पोलीस कोठडी

कांपाल येथील कॅसिनो कार्निव्हलमध्ये केला होता खून

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th May, 11:36 pm
सुरक्षारक्षकाच्या खूनप्रकरणी संशयितास सात दिवस पोलीस कोठडी

पणजी : कांपाल येथील कॅसिनो कार्निव्हलमध्ये गुरुवार, २९ रोजी पहाटे झालेल्या हल्ल्यात धीरू शर्मा (३३, मध्य प्रदेश) या सुरक्षा रक्षकाचा खून झाला होता. या प्रकरणी पणजी पोलिसांनी अटक केलेल्या अब्दुल अल्ताफ (२५, हैदराबाद) या संशयिताला पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.

कॅसिनो व्यवस्थापक अंबादत्त जोशी यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार, पहाटे ३.१० वाजता ग्राहक अब्दुल अल्ताफ याने कॅसिनोत हरल्यानंतर राडा केला. याच दरम्यान त्याला सुरक्षा रक्षकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संशयिताने लाकडी काठीच्या साहाय्याने सुरक्षारक्षकांवर प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात काठीच्या टोकाला असलेल्या लोखंडी क्लॅम्पमुळे सुरक्षा रक्षकाला गंभीर दुखापत झाली. धीरू शर्माला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तत्काळ बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात नेण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात दुसरा सुरक्षारक्षक सत्यम सुभाष गावकर (२७, शिरोडा -गोवा) हा जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार करुन घरी पाठवण्यात आले.

याबाबत माहिती मिळताच पणजी पोलीस निरीक्षक अनंत गावकर यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक स्थापन करण्यात आले. संशयित अब्दुल अल्ताफ (२५, हैदराबाद) हा दाबोळी विमानतळावरुन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली. अटक करण्यात आलेल्या संशयिताला शुक्रवारी पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयिताला सात दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.