एएनसीने केरळमधील एकाला केली अटक
पणजी : गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) ओशेल - शिवोली येथे छापा टाकून अल्फिन थॉमस (२९, केरळ) या संशयिताला अटक केली. त्याच्याकडून २२ लाख रुपये किमतीचा २०० ग्रॅम हायड्रोफॉनिक विड हा उच्च दर्जाचा गांजा आणि ०.६ ग्रॅम एलएसडी पेपर जप्त केले आहेत.
एएनसीने दिलेल्या माहितीनुसार, ओशेल - शिवोली येथील गणेश विसर्जन ठिकाणी ड्रग्ज तस्करी होणार असल्याची माहिती गुप्तहेरांनी एएनसीच्या अधिकाऱ्याला दिली होती. त्यानुसार, पोलीस अधीक्षक सुनीता सावंत आणि उपअधीक्षक नेर्लोन अल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीत पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक दिनदयाळनाथ रेडकर व इतर पथकाने २९ मे रोजी रात्री ८.३० ते ३० मे रोजी उत्तररात्री ००.१५ दरम्यान वरील परिसरात सापळा रचला. याच दरम्यान त्या ठिकाणी अल्फिन थॉमस (२९, केरळ) हा युवक आला. पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याच्याकडून २२ लाख रुपये किमतीचा २०० ग्रॅम हायड्रोफॉनिक विड हा उच्च दर्जाचा गांजा आणि ०.६ ग्रॅम एलएसडी पेपर जप्त केले. एएनसीने त्याच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.