निवडणुकीवेळी एकमेव अर्ज दाखल : विरोधी ५ पाच पंच अनुपस्थित.
मडगाव : राय ग्रामपंचायतीत उपसरपंचपदासाठीच्या निवडणुकीत मॅन्युअल रॉड्रिग्ज यांची निवड करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राय उपसरपंचांवर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता घेण्यात आलेल्या या निवडणुकीवेळी मॅन्युअल रॉड्रिग्ज यांचा एकमेव अर्ज सादर झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. सरपंचांनी राजीनामा दिल्याने पंचायतीवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. मात्र आता कारभाराची सूत्र उपसरपंच मॅन्युअल रॉड्रिग्ज सांभाळणार आहेत.
सासष्टीच्या मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या राय ग्रामपंचायतींतील सरपंच आणि उपसरपंच पद एकाच वेळी रिक्त झाल्यानंतर सरकार नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याकडून तात्पुरते प्रशासन चालवले जात होते. संचालक सिद्धी हळर्णकर यांच्या आदेशाने पंचायत संचालनालयाने पंचायतीच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी धाकलू घाडी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती.
यापूर्वी उपसरपंच ओस्वाल्ड डिसोझा यांच्याविरुद्ध सहा पंचायत सदस्यांच्या गटाने अविश्वास ठराव आणला होता. हा प्रस्ताव अलिकडेच मंजूर करण्यात आला. त्यानंतर सरपंच मारियो डिसोझा यांनी राजीनामा दिला, ज्यामुळे दोन्ही पदे रिक्त राहिली. तत्काळ पर्याय उपलब्ध नसल्यामुळे पंचायत संचालनालयाने हस्तक्षेप करत प्रशासकाची नेमणूक केली होती.
सोमवारी उपसरपंचपदासाठी निवडणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या निवडणुकीवेळी पंचायतीच्या ११ सदस्यांपैकी सहा पंच सदस्य उपस्थित होते, तर विरोधी पाच पंच सदस्यांची अनुपस्थिती होती. उपसरपंच पदासाठी मॅन्युअल रॉड्रिग्ज यांचा एकमेव अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल झाला होता. त्यानुसार मॅन्युअल यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली आहे. सद्यस्थितीत सरपंच पद रिक्त आहे.