स्वप्नील वाळके खून प्रकरण: ओंकार पाटीलच्या जामीन कालावधीत २५ दिवसांची वाढ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st June, 12:21 am
स्वप्नील वाळके खून प्रकरण: ओंकार पाटीलच्या जामीन कालावधीत २५ दिवसांची वाढ

मडगाव : चोरीच्या उद्देशाने मडगावातील कृष्णी ज्वेलर्सचे मालक स्वप्नील वाळके यांचा खून करण्यात आला. याप्रकरणातील संशयित ओंकार पाटील याने वडिलांच्या आजारपणामुळे जामीन अर्ज केला होता. न्यायालयाकडून केवळ नऊ दिवसांसाठी अटीशर्तीवर त्याला जामीन मंजूर केला होता. आता त्यात आणखी २५ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

मडगावात सप्टेंबर २०२० मध्ये भरदिवसा सोन्याचे दुकान लुटण्याचा प्रयत्न झाला होता. यात कृष्णी ज्वेलर्सचे मालक स्वप्नील वाळके यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी संशयितांना गजाआड केले होते. यात बिहार येथील शनी कुमार, राहुल कुमार, कुंदन कुमार यांच्यासह ओंकार पाटील, मुस्तफा शेख व इव्हेंडर रॉड्रिग्ज यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. संशयित ओंकार पाटील याने वडिलांना कर्करोगाची लागण झाली असून त्यांना पाहण्यासाठी व काळजी घेण्यासाठी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी संशयिताला २३ मे रोजी अटीशर्तीवर जामीन मंजूर केला होता. त्यावेळी संशयिताला केवळ नऊ दिवसांसाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे.

२५ हजारांची वैयक्तिक हमी व तेवढ्याच रकमेचा हमीदार द्यावा. या कालावधीत साक्षीदारांना धमकावणे किंवा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये. त्याला केवळ वडिलांसोबत राहण्याची मुभा देण्यात येत आहे, असेही न्यायालयाकडून जामीन अर्ज मंजूर करताना नमूद केले होते. त्यानंतर संशयित पाटील यांच्या वकिलांनी या जामीन कालावधीत वाढ करण्यात यावी असा मागणी अर्ज केला होता. त्यानुसार न्यायालयाकडून या आधी देण्यात आलेल्या अटी शर्थींवर नऊ दिवसांचा कालावधी संपुष्टात आल्यावर आणखी २५ दिवसांचा जामिनाचा कालावधी वाढविण्यात आला आहे.