मडगावात धक्कादायक प्रकार उघड; पाच संशयितांना अटक
मडगाव : सुरावली येथे बेकायदेशीररित्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर भरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. कोलवा पोलिसांकडून याप्रकरणी पाच संशयितांना अटक करण्यात आली असून ८० घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सुरावली येथील भंगार अड्ड्यामध्ये घरगुती गॅस सिलिंडरमध्ये बेकायदेशीररित्या गॅस भरण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती कोलवा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कोलवा पोलिसांनी सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सदर भंगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी अर्धवट संपलेल्या घरगुती गॅस सिलेंडर मधील उर्वरित गॅस काढून दुसऱ्या सिलेंडरमध्ये भरण्याचा प्रकार उघडकीस आला. धक्कादायक म्हणजे अशा प्रकारे अर्धवट गॅस भरलेल्या सिलिंडरची विक्रीही केली जात होती.
कोणत्याही परवान्याशिवाय व सुरक्षिततेचे कोणतेही नियम न पाळता खुल्या जागेत गॅस सिलेंडर भरण्याच्या प्रकाराने सार्वजनिक सुरक्षिततेला ही धोका निर्माण झाला होता. कोलवा पोलिसांना टाकलेल्या छाप्यात सदर भंगार अड्ड्यावर गॅस सिलिंडरसह गॅस भरणा करावयाचे साहित्य आढळून आले.
कोलवा पोलिसांकडून या प्रकरणी कारवाई करत ८० गॅस सिलिंडरसह गॅस रिफिलिंग करण्यासाठी वापरण्यासाठीचे साहित्यही जप्त केले आहे. कोलवा पोलिसांनी या बेकायदेशीररित्या गॅस भरण्याच्या प्रकरणात पाच जणांना ताब्यात घेत रीतसर अटक केली आहे. तसेच या प्रकरणात आणखी कुणी सामील आहेत का, याचाही शोध कोलवा पोलिसांकडून घेतला जात आहे.