चर्चा झाली, आता लक्ष पक्षश्रेष्ठींच्या निकालाकडे

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर प्रदेशाध्यक्ष दामू नाईक- मंत्री गोविंद गावडे यांच्यात चर्चा

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
02nd June, 05:02 pm
चर्चा झाली, आता लक्ष पक्षश्रेष्ठींच्या निकालाकडे

पणजीः  मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अखत्यारीतील आदिवासी कल्याण विभागात मोठा भ्रष्टाचार होत असल्याच्या मंत्री गोविंद गावडे यांनी केलेल्या वक्तव्य प्रकरणावर गेला आठवडाभर राज्यात चर्चा सुरू आहेत. या सर्व प्रकरणानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी आज आल्तिनो येथील मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांच्या शासकीय बंगल्यावर मंत्री गोविंद गावडे यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा केली.

याविषयी प्रदेशाध्यक्ष नाईक यांनी माहिती दिली असून मंत्री गोविंद गावडे यांची बाजू ऐकली असल्याचे त्यांनी सांगितले. गावडेंना पक्षाच्या धोरणांचीही कल्पना दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल आता दिल्लीला पक्षश्रेष्ठींना पाठवणार आहे. पक्षश्रेष्ठी त्यांच्याबाबत योग्य तो निर्णय घेतील, असे नाईक यांनी सांगितले. 

दामूंनी जे विचारले, त्याची उत्तरे दिली!
दरम्यान या चर्चेबाबत गावडे यांनी 'प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी बैठकीत जे मला काही विचारले,  त्याची उत्तरे मी त्यांना दिली आहेत,' असे स्पष्टीकरण दिले.

आता पक्षश्रेष्ठी मंत्री गोविंद गावडेंबाबत काय निर्णय घेणार, याकडे गोव्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.