टॅक्सी व्यावसायिकांचा वाढता विरोध : पोलीस बंदोबस्त तैनात
आक्षेप नोंदवण्यासाठी रांगेत उभे टॅक्सी व्यावसायिक. (नारायण पिसुर्लेकर)
पणजी : टॅक्सी चालक संघटनांनी राज्यात अॅप अग्रिगेटर नकोच अशी भूमिका कायम ठेवली आहे. सोमवारी या अधिसूचनेविरोधात आक्षेप नोंदवण्यासाठी राज्यभरातील टॅक्सीचालकांनी जुंता हाऊस येथे गर्दी केली. वाहतूक खात्याने आक्षेप स्वीकारण्यासाठी पाच विशेष बूथ घातले होते. यावेळी या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हा परिसर तसेच पणजी पोलीस स्थानक परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली होती. दिवसभरात १६०७ आक्षेप आल्याची माहिती खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
सोमवारी अॅप अग्रिगेटरबाबत राज्यातील विविध टॅक्सी संघटनांनी विविध आमदारांना भेट देऊन अॅपला विरोध केला. दुपारी १२.३० नंतर राज्यभरातील टॅक्सी मालक जुंता हाऊस परिसरात जमू लागले. यानंतर आक्षेप नोंदवण्यासाठी मोठी रांग लागली होती. याबाबत टॅक्सी संघटनेचे योगेश गोवेकर म्हणाले, गोव्यातील सर्व व्यवसाय याआधीच स्थानिकांच्या हातून गेले आहेत. टॅक्सी अॅपच्या माध्यमातून हा व्यवसाय खासगी कंपन्यांना देण्याचा डाव आहे. हा व्यवसाय आमच्या हातातून गेला तर आम्ही रस्त्यावर येणार आहोत. यासाठी आमचा याला विरोध कायम आहे. चेतन कामत यांनी सांगितले की, सरकारने अधिसूचना व आक्षेप देण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. यानुसारच आज आम्ही अक्षय घेण्यासाठी आलो होतो. आंदोलन करणे किंवा दंगा करणे हा आमचा हेतू नव्हता. त्यामुळे येथे एवढा पोलीस बंदोबस्त ठेवण्याची गरज नव्हती. कदाचित सरकार आम्हाला घाबरत असावे. आम्ही लोकशाही मार्गाने विरोध करत आहोत. पुढील काही दिवसांत दहा हजारहून अधिक टॅक्सी बंद अॅपच्या विरोधात आक्षेप नोंदवणार आहेत. सध्या राज्यात दोन अॅप अस्तित्वात असताना नव्या अॅपची गरज काय होती हे सरकारने स्पष्ट करावे.
फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये
चेतन कामत म्हणाले की, मंत्री बाबुश मोन्सेरात रेंट ए कॅब, बाईकचा मुद्दा आणून आमच्यामध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहेत. या मुद्द्यावर आम्ही सर्व एकत्र आहोत. त्यांनी बोलण्यापूर्वी विचार करावा. त्यांनी आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये.