हवेतून भिरभिरत फुटबॉल आला आणि...

महिलेने हकनाक गमावला जीव

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th June, 12:09 pm
हवेतून भिरभिरत फुटबॉल आला आणि...

म्हापसा : कोणाचा मृत्यू कसा होईल, हे सांगता येणार नाही. कधी अकस्मात अपघात होऊन, तर कधी हसतखेळत असतानाही एखाद्याचा जीव जातो. म्हापसा येथेही अशाच एका दुर्दैवी घटनेत एका महिलेने हकनाक जीव गमावला.

यल्लम्मा बसवराज लक्कुंदी (५३, रा. मोरजी पेडणे व मूळ कर्नाटक) ही महिला ३१ मे रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गणेशपुरी-म्हापसा येथून आपल्या जावयासमवेत दुचाकीच्या मागे बसून जात होती. ती मोरजीहून म्हापशाकडे येत होती. त्यांची दुचाकी गणेशपुरी येथील क्रीडा मैदानासमोर पोहोचली. 

त्यावेळी मैदानावर काही मुले फुटबॉल खेळत होती. एका मुलाने फुटबॉलला कीक मारली आणि फुटबॉल वेगाने भिरभिरत रस्त्यावर आला. नेमकी त्याच वेळी यल्लम्मा आणि तिचा जावई दुचाकीवरून तिथे पोहोचले. वेगाने आलेला फुटबॉल यल्लम्मावर आदळला आणि ती दुचाकीवरून खाली पडून जखमी झाली.

तिला प्रथम म्हापसा जिल्हा इस्पितळात व नंतर गोमेकॉत हलविण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना सोमवार दि. २ जून रोजी यल्लम्माचा मृत्यू झाला. म्हापसा पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.