पणजी
पं. दिनदयाळ उपाध्याय जयंती कार्यक्रमानिमित्त दिल्लीला गेलेले भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक रविवारी रात्री गोव्यात पोहोचले आहेत. दामू नाईक सोमवारी सकाळी मंत्री गोविंद गावडे यांच्याशी त्यांनी आदिवासी कल्याण खात्याच्या कारभारासंदर्भात केलेल्या वक्तव्यांबाबत चर्चा करणार आहेत.
मंत्री गावडे यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यासंदर्भातील अहवाल दामू पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवतील. त्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर मंत्री गावडे यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती भाजपातील सूत्रांनी रविवारी 'गोवन वार्ता'शी बोलताना दिली.
वादग्रस्त वक्तव्य: आदिवासी कल्याण खाते आणि 'उटा' संघटनेतर्फे गेल्या रविवारी फोंड्यात आयोजित प्रेरणा दिन कार्यक्रमात बोलताना मंत्री गावडे यांनी आदिवासी कल्याण खात्याच्या कारभारावर टीकास्र सोडले होते. पणजीतील श्रमशक्ती भवनाखाली कंत्राटदारांकडून 'घेवाण-देवाण' होऊन फायली वर पोहोचवल्या जातात, असे म्हणत या खात्यात भ्रष्टाचार सुरू असल्याचा अप्रत्यक्ष आरोपही त्यांनी केला होता.
नेतृत्वाची प्रतिक्रिया: आदिवासी कल्याण खाते सध्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे असल्यामुळे गावडेंनी केलेल्या आरोपांवरून सत्ताधाऱ्यांतील वरिष्ठ नेत्यांनी गावडेंवर टीका केली. तर, हीच संधी साधून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केले.
सध्याची स्थिती
मंत्री गोविंद गावडे यांनी आदिवासी कल्याण खात्याच्या कारभारावर टीकास्र सोडले, त्या काळात प्रदेशाध्यक्ष दामू नाईक गोव्याबाहेर होते. पण, गावडेंनी पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्याने यावेळी त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल. गोव्यात आल्यानंतर आपण त्यांच्याशी चर्चा करू आणि त्यानंतर कारवाई करू, अशी हमी नाईक यांनी दिली होती.
'उटा' संघटनेकडून दबाव
गोविंद गावडे यांनी आदिवासी कल्याण खात्याच्या कारभाराबाबत जी भूमिका मांडली, ती संपूर्ण आदिवासी समाजाची होती. याचा विचार करून सरकार किंवा भाजपने गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळू नये, असे म्हणत 'उटा' संघटनेने सरकारवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याची पूर्ण माहिती दामू नाईक यांनी पक्षश्रेष्ठींना दिली आहे.
सोमवारी अपेक्षित घडामोडी
- दामू नाईक दिल्ली दौऱ्यानंतर गोव्यात परतले; मंत्री गोविंद गावडे यांच्याशी आदिवासी कल्याण खात्याच्या कारभाराविषयी चर्चा करणार.
- गावडेंच्या बाजूचा अहवाल दामू नाईक पक्षश्रेष्ठींना सादर करतील; त्यानंतर कारवाईसाठी अंतिम निर्णय होणार.
- 'उटा' संघटनेच्या दबावाखाली सरकार आणि भाजपची भूमिका महत्त्वाची; सोमवारी या प्रकरणात पुढील स्पष्टता मिळणार.