पणजी
'समग्र शिक्षा अभियाना'च्या गोवा शाखेच्या बँक खात्यातून ५ कोटी रुपयांची अफरातफर केल्या प्रकरणी पर्वरी पोलिसांना आणखी तिघा संशयितांना अटक करण्यात यश आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे, जे सर्व मूळचे पश्चिम बंगालचे आहेत.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये पश्चिम बंगालमधून सुमंता मोंडल (४०), तर दिल्लीतून आलामिन मोंडल (३५) आणि बिद्याधर मलिक (५२) यांचा समावेश आहे.
याप्रकरणी 'समग्र शिक्षा अभियाना'चे संचालक डॉ. शंभू घाडी यांनी पर्वरी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, मार्च २०२५ मध्ये अभियानाच्या गोवा शाखेच्या बँक खात्यातून ५ कोटी रुपयांची अफरातफर झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तपासाची माहिती
उत्तर गोवा अधीक्षक राहुल गुप्ता, उपअधीक्षक विश्वेश कर्पे आणि निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सीताराम मलिक, मंदार परब आणि साईल वायंगणकर यांच्या नेतृत्वाखाली कॉन्स्टेबल महादेव नाईक, हरूण शेख, तुषार राऊत, नीतेश गावडे, आकाश नाईक आणि हेमंत गावकर यांच्या पथकाने पश्चिम बंगालमध्ये जाऊन तपास केला. तिन्ही संशयितांना रविवारी गोव्यात आणून अटक केली. त्यानंतर तिन्ही संशयितांना म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.