फोंडा
उसगाव-गांजे येथील नदीवर पोहण्यासाठी गेलेले दोन युवक बुडाले, तर पाण्याच्या मध्यभागी अडकलेल्या अन्य दोन युवकांना अग्निशमन दलाने सुखरूप वाचवले. विशेष म्हणजे, पावसाळ्यातील धोका लक्षात घेऊन २४ मे ते २४ जुलै या कालावधीत उत्तर गोव्यातील जलसाठ्यांवर प्रवेशबंदी लागू असतानाही ही घटना घडल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय क्रीडा प्राधिकरणाशी (एसएआय) संलग्न असलेले काही युवक रविवारी गांजे येथील नदीवर जलक्रीडा करण्यासाठी गेले होते. त्यांना नदीतील पाण्याचा अंदाज नव्हता, आणि अशातच पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. त्यामुळे धनंजय खैरनार (१८, धुळे-महाराष्ट्र) आणि लवप्रीत सिंग (२४, पटियाला-पंजाब) नावाचे दोन युवक प्रवाहात वाहून गेले. तर, उर्वरित दोघांनी नदीच्या मध्यभागी एका दगडावर थांबून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.
अग्निशमन दलाची कारवाई: अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अडकलेल्या युवकांना वाचवण्यासाठी परिस्थिती पाहून बंधाऱ्याच्या प्लेट्स पुन्हा लावण्यात आल्या आणि त्यानंतर त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
मृतदेह सापडला: बुडालेल्या दोन युवकांपैकी लवप्रीत सिंग याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे, तर धनंजय खैरनार याचा शोध घेण्याचे कार्य रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
प्रवेशबंदीची सख्त सूचना
उत्तर गोव्यातील तलाव, नद्या, धबधबे, खाणींचे खंदक व अन्य नैसर्गिक जलसाठ्यांवर २४ मे ते २४ जुलै या कालावधीत प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. पावसाळ्यात अशा ठिकाणी बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडत असल्याने ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, बंदी असतानाही नदीवर गेलेल्या युवकांपैकी दोघे बुडाले असल्यामुळे सुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीवर आणि युवकांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.