कैरीची उडीदमेथी

Story: चमचमीत रविवार |
01st June, 12:09 am
कैरीची उडीदमेथी

साहित्य : 

मोठे ७ ते ८ चमचे तेल
१ बारीक चमचा कच्चे तांदूळ
१ बारीक चमचा उडदाची डाळ
पाव  चमचा मेथी
१० सुक्या मिरच्या
१ मोठा चमचा धने
अर्धा किलो कैऱ्या मध्यम चिरलेल्या.
१ वाटी गूळ
१ चमचा हळद
१ मोठी वाटी नारळाचं खोबरं
१ बारीक चमचा हिंगाची पूड
१ बारीक चमचा मोहरी
चवीनुसार मीठ 

कृती : 

एका भांड्यात २ चमचे तेल घ्या. तेल गरम झाल्यावर त्यात १ बारीक चमचा कच्चे तांदूळ, १ बारीक चमचा उडदाची डाळ, आणि पाव चमचा मेथी घाला व हे सगळं मिश्रण छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. भाजून झाल्यावर काढून घ्या व त्याच भांड्यात १० सुक्या मिरच्या व एक मोठा चमचा धने घाला. हे आपल्याला तेलात भाजायची गरज नाही, सुके भाजले तरी चालेल. याने उडीदमेथीला छान रंग येतो. छान वास येईपर्यंत भाजून घ्या व थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.

आता मध्यम चिरलेल्या कैऱ्या घ्या. कैऱ्यांना छान १ वाटी गूळ लावून घ्या, तुमच्या गोडीनुसार. आता यात एक चमचा हळद व चवीनुसार मीठ घाला आणि छान एकत्र करून ५ ते १० मिनिटांसाठी बाजूला ठेवा.

आता एका मिक्सरच्या भांड्यात कच्च्या तांदुळाचे मिश्रण आणि सुक्या मिरच्यांचे मिश्रण घ्या. यात १ मोठी वाटी ओल्या नारळाचं खोबरं व वाटण्यासाठी पाणी घाला आणि छान बारीक वाटून घ्या.

आता एका भांड्यात ४ ते ५ चमचे तेल घ्या. तेल गरम झाल्यावर त्यात १ बारीक चमचा हिंगाची पूड व १ बारीक चमचा मोहरी घाला. मोहरी छान तडतडली की मगाशी बाजूला ठेवलेल्या कैऱ्या आणि वाटण घाला. आता तुम्हाला पाहिजे त्यानुसार पाणी घाला. चवीनुसार मीठ घाला. मीठ जास्त घालू नका, कारण आपण कैऱ्यांना मीठ लावले होते. छान एकत्र करा. साधारण ३ ते ४ मिनिटे उकळी काढा.


संचिता केळकर