युपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. आपल्या दैनंदिन सवयी, विशेषतः वाचन, मनन आणि विचार करण्याची पद्धत, हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे.

जेव्हा एखादा उमेदवार मी IAS, IPS परीक्षा उत्तीर्ण होणार व पुढे मोठा अधिकारी होऊन देश सेवा करणार अशी स्वप्ने बघत असेल, तर ती स्वप्ने बघायला काहीच हरकत नाही. परंतु ती स्वप्ने डोळसपणे तडीस नेणे फार गरजेचे आहे. यात सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या सवयी. आपल्या दैनंदिन सवयी या अतिशय महत्त्वाच्या असतात. किंबहुना, शेवटच्या IAS अंतिम मुलाखतीमध्ये सुद्धा 'तुमच्या सवयी व छंद' या विषयापासून मुलाखत सुरुवात होते. त्यामुळे सवयी या फार महत्त्वाच्या आहेत. सध्या यूट्यूबवर अनेक ऑल इंडिया रँकिंग असलेल्या नामांकित उमेदवारांच्या मुलाखती व व्हिडिओ उपलब्ध असतात. त्यातील माहिती खूपदा खूपच उपयोगी असते.
अत्यंत महत्त्वाची सवय म्हणजे 'वाचन'. 'वाचेल तो वाचेल' या शब्दाचा जो अर्थ दडलेला आहे, त्याचा शब्दशः अर्थानेच येथे ही सवय लागली पाहिजे. परंतु वाचन म्हणजे केवळ ज्ञानाचे भांडार करून चालणार नाही. IAS उमेदवार हा 'गुगल' असू नये ही महत्त्वाची अपेक्षा कमिशनरची असते. त्यामुळे जे वाचतोय, त्या विषयावर त्या उमेदवाराचे मनन किती आहे? त्याचे त्या विषयावर स्वतःचे काही स्वतंत्र विचार आहेत की हा एक पुस्तकी किडा आहे, असेही अवलोकन शेवटच्या टप्प्यात मुलाखतीमध्ये केले जाते. त्यामुळे विषयावर सखोल चिंतन-मनन करून एक भूमिका कोणती घेता येते, याचे विलक्षण आकलन करता येणे आवश्यक आहे. क्रिकेटमध्ये जसा एबी डिव्हिलियर्स हा ३६० डिग्री प्लेयर आहे, तसाच दृष्टिकोन विद्यार्थ्याला ३६०० या कोनातून ठेवावा लागतो. प्रत्येक विषयाला वेगवेगळे कंगोरे असू शकतात व उमेदवार किती 'फ्लेक्झिबल' आहे आणि विचार करताना तो किती बारकाईने विचार करू शकतो, हेही तेथे तपासले जाते. UPSC च्या अधिकृत अभ्यासक्रमातील पुस्तके नीट अभ्यासावीत. वाचनात फापटपसारा असू नये. नाहीतर मग सर्वच वाचत बसावे लागेल व ज्या ज्ञानाचा अर्ध्याअधिक परीक्षेसाठी काहीही उपयोग नसेल, तेथे विद्यार्थ्यांचा अमूल्य वेळ वाया जाईल.
दुसरी सवय मनन ही आहे. उत्तम विषयाची जाण आणि योग्य मनन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शांत राहणे अतिशय महत्त्वाचे आहे. दीर्घ आणि सावकाश श्वासोच्छ्वासाने मन शांत होते व विवेकबुद्धी जागृत होते. शांततेने आणि विवेकबुद्धीने मनन आणि चिंतन परिणामकारक होते. त्यामुळे ऋषीमुनी म्हणतात की, अति रागात, अति दुःखात, अति आनंदात कोणतीही गोष्ट ठरवू नये किंवा वचन देऊ नये व घेऊ पण नये. कारण या भरात आपले मन व बुद्धी आपल्या ताब्यात नसते. खूपदा नुकसान पदरी पडते. स्थितप्रज्ञाची लक्षणे जर वाचली तर लक्षात येईल की इथे मनन व चिंतन किती परिणामकारक ठरते. सिव्हिल ऑफिसर्सना त्यांच्या कार्यकाळात असेच खूप निर्णय घ्यायचे असतात की, ज्यात दडपण नसावे आणि अंतिमतः लोकहित जपले गेले पाहिजे. त्यामुळे प्राणायाम या दोन्ही गोष्टी नीट जोडून ठेवतो. सर्व प्रकारच्या परीक्षा, मुलाखती या अंतिमतः मेंदूशी निगडित आहेत. मेंदूला योग्य व्यायाम, खुराक, शांतता, स्तब्धता व तरतरीतपणा अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे योग्य प्राणवायूचा पुरवठा हा अतिशय गरजेचा आहे.
तिसरी सवय म्हणजे सवय लावून घेण्याची सवय लावणे. वाक्य मजेशीर वाटेल पण हेच सत्य आहे. सवय लावून घेण्याची सवय करा म्हणजे निग्रहात सातत्य आणा. केवळ पुस्तकी ज्ञान महत्त्वाचे नसून, ते कसे आत्मसात केले जाते आणि त्यावर आधारित स्वतःचे विचार कसे विकसित होतात, हे UPSC च्या प्रवासात निर्णायक ठरते. दररोज थोडा वेळ का होईना, पण शांतपणे बसून वाचलेल्या गोष्टींवर विचार करणे, त्यांचे विविध पैलू समजून घेणे, आणि त्यातून स्वतःची भूमिका ठरवणे हे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे केवळ परीक्षेतील यशच नव्हे, तर भविष्यातील अधिकारी म्हणून योग्य आणि न्यायपूर्ण निर्णय घेण्याची क्षमताही विकसित होते. स्वतःला शिस्त लावून नियमितपणे या सवयींचा अंगीकार करणे, हेच यशाचे खरे सूत्र आहे.

अॅड. शैलेश कुलकर्णी, कुर्टी - फोंडा
(लेखक नामांकित वकील आणि
करिअर समुपदेशक आहेत.)