युपीच्या हमीरपुरमध्ये 'सायको किलर' आणि पोलिसांची चकमक

चकमकीत लागली दोन्ही पायांना गोळी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
30th May, 03:19 pm
युपीच्या हमीरपुरमध्ये 'सायको किलर' आणि पोलिसांची चकमक

हमीरपुर : लोखंडी रॉडने वार करून लोकांची हत्या करणारा ‘सायको किलर’ रामबाबू विश्वकर्मा याला उत्तर प्रदेश पोलिसांनी अखेर चकमकीनंतर अटक केली आहे. या विकृत आरोपीने नुकताच एका झोपलेल्या दाम्पत्यावर हल्ला करून पत्नीचा खून केला, तर पती या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता.

चकमकीत लागली दोन्ही पायांना गोळी

पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळ्या टीम तयार केल्या होत्या. गुरुवारी मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी चहूबाजूंनी घेरल्यानंतर रामबाबूने गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केला आणि त्याच्या दोन्ही पायांवर गोळ्या झाडून त्याला जायबंदी केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर आणि कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर त्याला जेरबंद केले. सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्याच्याकडून एक पिस्तूल (देसी तमंचा), काडतुसे आणि रक्ताने माखलेले कपडे जप्त करण्यात आले आहेत.

हत्येचा भयानक पॅटर्न

पोलीस तपासात समोर आले आहे की रामबाबूने जालौन जिल्ह्यात देखील अशाच प्रकारे दोन हत्या केल्या होत्या. तो नेहमी लोखंडी वस्तूने डोक्यावर वार करतो आणि मृत्यू होईपर्यंत मारतो. रक्त पाहून त्याला समाधान मिळते. आरडाओरडीचाही  त्याच्यावर कोणताही परिणाम करत नाही.

पूर्वीही गेला आहे तुरुंगात

रामबाबू याने २०१७ मध्येही एक हत्या केली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारी सुरू केली. यावेळी चोरीच्या उद्देशाने तो गावात आला होता, पण लोकांनी पाहिल्यामुळे त्याने थेट हल्ला केला.

मानसिक स्थिती संशयास्पद

पोलिसांच्या माहितीनुसार, तो जालौनमध्ये आपल्या बहिणीकडे राहत होता आणि भेलपुरीचा गाडा चालवत होता. माहितीनुसार त्याने एकदा स्वतःच्या वडिलांवरही प्राणघातक हल्ला केला होता.  स्थानिक पोलीस स्थानकाचे निरीक्षक राजीव प्रताप सिंह यांनी सांगितले की, आरोपीला त्याच्या चुलत्याच्या शेतातून पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने गोळीबार केला. त्यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तरात गोळी झाडली आणि अखेर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी या सायको किलरच्या विकृत कृत्यांची सखोल चौकशी सुरू केली असून, आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.