क्रीडा वार्ता : नॉर्वे चेस २०२५ स्पर्धेत डी. गुकेशचा ऐतिहासिक विजय

क्लासिकलमधील पराभव मॅग्नस कार्लसनच्या जिव्हारी!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
02nd June, 11:05 am
क्रीडा वार्ता : नॉर्वे चेस २०२५ स्पर्धेत डी. गुकेशचा ऐतिहासिक विजय

स्टावेंगर नॉर्वे चेस २०२५ स्पर्धेत विद्यमान बुद्धिबळ विश्वविजेता डी. गुकेशने स्पर्धेच्या सहाव्या फेरीत माजी विश्वविजेता मॅग्नस कार्लसनला पराभूत करत इतिहास रचला. हा सामना नॉर्वेतील स्टावेंगर येथे खेळवण्यात आला. क्लासिकल फॉर्मेटमध्ये कार्लसनवर विजय मिळवणारा गुकेश हा केवळ दुसराच भारतीय खेळाडू ठरला आहे.



सामन्यानंतर कार्लसनची निराशा स्पष्टपणे दिसून आली. त्यांनी चेस बोर्डवर रागात हात आपटला आणि थेट कारमध्ये गेले.हा पराभव कार्लसनच्या कारकिर्दीतील सर्वात धक्कादायक असल्याचे मत ग्रँडमास्टर सुसान पोल्गर यांनी व्यक्त केले. गुकेशने या सामन्यात अत्यंत संयम आणि काटेकोर रणनीतीने खेळ करत निर्णायक क्षणी कार्लसनची चूक साधून विजय मिळवला.  सामन्यानंतर गुकेशने आपल्या प्रशिक्षकासोबत जोरदार फिस्ट बंप करत आनंद व्यक्त केला. 



नॉर्वे चेस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत डी. गुकेशला मॅग्नस कार्लसनकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्या विजयानंतर कार्लसनने सोशल मीडियावर एक सूचक प्रतिक्रिया दिली होती . जेव्हा तुम्ही राजासोबत खेळता, तेव्हा चूक होता कामा नये.' अशी टिप्पणी त्याने केली होती. गुकेशने सहाव्या फेरीत उत्कृष्ट खेळी करत या वक्तव्याला खेळातूनच ठोस उत्तर दिले. या विजयाने त्याने त्या पराभवाचा वचपा काढला. ही कामगिरी गुकेशच्या  कारकिर्दीसाठी मैलाचा दगड ठरणारी आहे.