पहिल्या क्वालिफायर सामन्यावर पावसाचे सावट

आज मोहाली येथे बंगळुरू विरुद्ध पंजाब क्वालिफायर १ सामना

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
28th May, 11:30 pm
पहिल्या क्वालिफायर सामन्यावर पावसाचे सावट

माेहाली : गुरुवारी मोहालीत पहिला क्वालिफायर सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात मुल्लानपूर क्रिकेट स्टेडियम येथे खेळला जाणार आहे. जिंकणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळेल आणि एलिमिनेटरच्या विजेत्याशी सामना करेल. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट आहे.
आधी क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटर सामने हैदराबादमध्ये खेळवले जाणार होते, परंतु आयपीएलने अधिकृतपणे जाहीर केले होते की आता हे दोन्ही सामने मुल्लानपूर येथे हलविण्यात आले आहेत. प्लेऑफ सामने गुरुवारपासून सुरू होत आहेत. क्वालिफायर १ हा सामना पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होईल. आरसीबीने लखनौला हरवून टेबलमध्ये दुसरे स्थान मिळवले होते.
जर पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामना रद्द झाला तर पंजाबला अंतिम फेरीचे तिकीट मिळेल. तर आरसीबीला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी क्वालिफायर-२ खेळावे लागेल. नियमांनुसार, पॉइंट टेबलमध्ये अव्वल संघाला प्राधान्य दिले जाते.
प्लेऑफ सामन्यांच्या राखीव दिवसाबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. गेल्या हंगामात आयपीएलच्या अंतिम फेरीसाठी राखीव दिवस निश्चित करण्यात आला होता. परंतु बीसीसीआयने एक नवीन नियम आणला आहे, ज्यामुळे सामना रद्द होण्याची शक्यता खूपच कमी होते.
बीसीसीआयने आयपीएल २०२५ सामन्यांच्या अतिरिक्त वेळेत १२० मिनिटे वाढवले आहेत, त्यानुसार संपूर्ण २० षटकांचा सामना रात्री ९.३० वाजेपर्यंत सुरू करता येईल.आयपीएल २०२५ च्या स्पर्धेतील प्लेऑफसाठी ४ संघ ठरले. यामध्ये पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सचा समावेश आहे. आयपीएलमधील लीग टप्प्यातील सर्व सामने आता संपले. त्यामुळे सध्या ऑरेंज आणि पर्पल कॅप कोणाकडे राहिल, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
ऑरेंज कॅप सध्या गुजरात टायटन्सचा फलंदाज साई सुदर्शनकडे आहे. साई सुदर्शनने १४ सामन्यांमध्ये ६७९ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने ५ अर्धशतके आणि १ शतक ठोकले आहे. आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत साई सुदर्शनने ७८ चौकार आणि २० षटकार ठोकले आहेत.
पर्पल कॅप सध्या चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाज नूर अहमदकडे आहे. त्याने १४ सामन्यांत २४ बळी घेतले आहेत. तथापि, त्याचा संघ सीएसके प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे, त्याचा प्रवास संपला आहे, त्यामुळे लवकरच त्याच्याकडून ही कॅप हिसकावून घेतली जाऊ शकते. आतापर्यंत, सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या टॉप ५ यादीत, नूर वगळता सर्वांचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे.
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत असणारे फलंदाज

साई सुदर्शन (गुजरात टायटन्स) - १४ सामने ६७९ धावा
शुभमन गिल (गुजरात टायटन्स) - १४ सामने ६४९ धावा
सूर्यकुमार यादव (मुंबई इंडियन्स) - १४ सामने ६४० धावा
मिशेल मार्श (लखनऊ सुपर जायंट्स) - १३ सामने ६२७ धावा (प्लेऑफमधून बाहेर)
विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) - १३ सामने ६०२ धावा
पर्पल कॅपच्या शर्यतीत असणारे गोलंदाज
नूर अहमद (चेन्नई सुपर किंग्ज)- १४ सामने २४ बळी (प्लेऑफमधून बाहेर)
प्रसिद्ध कृष्णा (गुजरात टायटन्स)- १४ सामने २३ बळी
ट्रेंट बोल्ट (मुंबई इंडियन्स)- १४ सामने १९ बळी
जोश हेझलवूड (आरसीबी)- १० सामने १८ बळी
अर्शदीप सिंग (पंजाब किंग्ज)- १४ सामने १८ बळी
प्लेऑफ सामन्यांचे वेळापत्रक
२९ मे- क्वालिफायर १: पंजाब विरुद्ध बंगळुरु (मुल्लानपूर स्टेडियम)
३० मे- एलिमिनेटर: गुजरात विरुद्ध मुंबई (मुल्लानपूर स्टेडियम)
१ जून- क्वालिफायर २: पहिल्या क्वालिफायरच्या सामन्यात पराभूत झालेला संघ विरुद्ध एलिमिनेटर विजेता (नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद)
३ जून- अंतिम सामना: पहिल्या क्वालिफायरचा विजयी संघ विरुद्ध दुसऱ्या क्वालिफायरमधील विजयी संघ (नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद)
पाऊस ठरू शकतो ​व्हिलन
मोहालीत गुरुवारी तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. ढगाळ वातावरण असेल आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. परंतु शुक्रवारी येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे, या दिवशी एलिमिनेटर सामना होईल. यामध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स एकमेकांसमोर येतील आणि पराभूत संघ बाहेर पडेल. पॉइंट्स टेबलमध्ये गुजरात तिसऱ्या आणि मुंबई चौथ्या स्थानावर आहे.