मुंबईकडून गुजरात चारीमुंड्या चित

क्वालीफायर २ मध्ये धडक : रोहितचे दमदार अर्धशतक

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
31st May, 12:48 am
मुंबईकडून गुजरात चारीमुंड्या चित

चंदिगढ : येथे खेळविण्यात आलेल्या एलिमेनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरातचा २० धावांनी पराभव करत क्वालीफायर २ मध्ये प्रवेश केला. मुंबईतर्फे रोहित शर्माने ८१ धावांची दमदार खेळी केली. तर गुजराततर्फे साईसुदर्शची ८० धावांची खेळी व्यर्थ गेली.
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मुंबईने जबरदस्त फलंदाजी करत २० षटकांत ५ गड्यांच्या बदल्यात २२८ धावा केल्या. या डावात रोहित शर्माने शानदार अर्धशतक झळकावले तर इतर फलंदाजांनीही झंझावाती खेळी करत संघाला मजबूत स्थितीत नेले.

रोहित शर्माने फक्त ५० चेंडूत ८१ धावा केल्या. त्यामध्ये ९ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राईक रेट १६२ इतका होता. त्याने मुंबईच्या डावाची भक्कम पाया रचला. जॉनी बेअरस्टोने दमदार पुनरागमन करत केवळ २२ चेंडूत ४७ धावा केल्या.त्याने ४ चौकार आणि ३ षटकार खेचले आणि संघाच्या धावगतीला गती दिली.
सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माची दमदार साथ
सूर्यकुमार यादवने २० चेंडूत ३३ धावा केल्या तर तिलक वर्माने अवघ्या ११ चेंडूत २५ धावा ठोकल्या. हार्दिक पंड्या व नमन धीर यांनी शेवटच्या षटकांत गुजरातच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. कर्णधार हार्दिक पंड्या ९ चेंडूत नाबाद २२ तर नमन धीरने ६ चेंडूत ९ धावा केल्या. मुंबईने २० षटकांत ५ बाद २२८ धावांचा डोंगर रचला. स्ट्राईक रेट्सवर नजर टाकल्यास, बहुतांश फलंदाजांचा स्ट्राईक रेट १५० पेक्षा जास्त होता, जो टी-२० मध्ये खूप मोठा मानला जातो.
मुंबई इंडियन्सने २० षटकांत २२८ धावा ठोकत प्रतिस्पर्धी गुजरात संघावर दडपण आणले. या सामन्यात गुजरात संघाच्या गोलंदाजांना विकेटसाठी झगडावे लागले.
गुजरततर्फेप्रसिद्धने ४ षटकांत ५३ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या. त्याचा इकॉनॉमी दर १२.२० इतका उच्च होता, मात्र त्याने रोहित शर्मा आणि नामन धीर यांसारख्या महत्त्वाच्या फलंदाजांना बाद केल.
साई किशोरने देखील ४ षटकांत ४२ धावा देऊन २ विकेट्स घेतल्या. त्याचा इकॉनॉमी १०.५० होता, परंतु त्याने बॅरिस्टो आणि सूर्यकुमार यादव यांना माघारी धाडत सामना थोडा नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. मोहम्मद सिराजने ४ षटकांत ३७ धावा देत १ विकेट घेतली. त्याचा इकॉनॉमी ९.२० होता आणि त्याने तिलक वर्माला बाद करत महत्त्वाचा ब्रेकथ्रू मिळवून दिला.
राशीद खान, कोएत्झी आणि वॉशिंग्टन सुंदर हे गोलंदाज अपयशी ठरले. मुंबई इंडियन्सच्या आक्रमक फटकेबाजीपुढे गुजरातचे बहुतेक गोलंदाज निष्प्रभ ठरले. रशीद खानसारखा गोलंदाजदेखील विकेट घेऊ शकला नाही.
मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी चांगली झुंज दिली, मात्र २२८ धावांचा पाठलाग करताना संघाला ६ बाद २०८ या धावसंख्येवरच समाधान मानावे लागले. साई सुधर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी दमदार अर्धशतकी खेळी करत संघाला सामन्यात टिकवून ठेवले, पण विजयासाठी ती पुरेशी ठरली नाही.
साई सुदर्शनची जबरदस्त खेळी
साई सुदर्शनने ४९ चेंडूंमध्ये ८० धावांची खेळी केली, ज्यात १० चौकार आणि १ षटकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राईक रेट १६३.२७ इतका होता. त्याने मजबूत पाया रचला, पण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना त्याला अधिक साथ मिळाली नाही.
सुंदरने फक्त २४ चेंडूंमध्ये ४८ धावा ठोकल्या. त्यात ५ चौकार आणि ३ षटकार होते. त्याचा स्ट्राईक रेट २०० इतका होता आणि त्याने काही वेळ सामना परत गुजरातच्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला.
कुसल मेंडिस आणि रदरफोर्डची उपयुक्त खेळी
कुसल मेंडिसने १० चेंडूत २० धावा केल्या. शर्फेन रदरफोर्डने १५ चेंडूत ४ चौकारांसह २४ धावा ठोकल्या. शुभमन गिल २ चेंडूत फक्त १ धावा करून, बाेल्टचा शिकार ठरला. राहुल तेवतियाने ११ चेंडूत १६ धावा केल्या. शाहरुख खानने ७ चेंडूत १३ धावा केल्या. ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह यांच्या अचूक माऱ्यामुळे गुजरातला मोठ्या धावांचा पाठलाग यशस्वी करता आला नाही. ट्रेंट बोल्टने ४ षटकांत ५६ धावा देत २ बळी घेतले. बोल्टने महत्त्वाच्या टप्प्यांवर विकेट्स घेत सामन्याचे चित्र बदलले, जसप्रीत बुमराहने ४ षटकांत २७ धावा देत १ बळी घेतला. ग्लीसन आणि अ‍ॅश्विनी कुमार यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. मिचेल सॅन्टनरने एका षटकात १० धावा देत १ बळी घेतला.

हिटमॅनचा विक्रम
एलिमिनेटरमध्ये रोहित शर्माला दोन जीवदान मिळाले असतील, पण त्यानंतरही रोहित शर्माने आपली आक्रमक शैली सोडली नाही. त्याने ५० चेंडूत ८१ धावांच्या जोरावर एक खास पराक्रम केला आहे. या सामन्यात रोहित शर्माला सुरुवातीलाच दोन जीवदान मिळाले. त्याला सुरुवातीला तीन धावांवर आणि नंतर १२ धावांवर जीवदान मिळाले. त्यानंतर रोहित शर्माने कोणतीही संधी दिली नाही आणि सतत धावा काढत राहिला. रोहित शर्माने सामन्यात दोन षटकार मारताच, तो आयपीएलमध्ये ३०० षटकार मारणारा भारताचा पहिला फलंदाज आणि जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत क्रिस गेल अव्वल स्थानावर आहे. त्याने फक्त १४२ आयपीएल सामन्यांमध्ये ३५७ षटकार मारले आहेत.
तो इतका पुढे आहे की इतर कोणत्याही फलंदाजाला त्याची बरोबरी करण्यासाठी बराच वेळ लागेल. दरम्यान, रोहित शर्माने ३०० षटकारांचा टप्पाही गाठला आहे. रोहित शर्माचा आयपीएलमधील हा २७२ वा सामना आहे. तथापि, विराट कोहली लवकरच ३०० षटकारही पूर्ण करू शकतो. कोहलीने आतापर्यंत २६६ आयपीएल सामन्यांमध्ये २९१ षटकार मारले आहेत, म्हणजेच त्याला फक्त ९ षटकारांची आवश्यकता आहे.
रोहित शर्माच्या ७ हजार धावा पूर्ण
एवढेच नाही तर रोहित शर्माने आयपीएलमध्ये सात हजार धावा पूर्ण केल्या आहेत. या बाबतीत विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत २६६ सामन्यांमध्ये ८६१८ धावा केल्या आहेत. रोहित शर्माने त्याच्या २७२ व्या सामन्यात सात हजार धावा पूर्ण केल्या आहेत. या सामन्यापूर्वी रोहितच्या नावावर ६९७६ धावा होत्या, ज्या आता सात हजारांच्या पुढे गेल्या आहेत. रोहित शर्माने आतापर्यंत आयपीएलमध्ये दोन शतके आणि ४७ अर्धशतके झळकावली आहेत. आता या वर्षीच्या आयपीएलमध्ये तो आणखी किती धावा काढतो हे पाहावे लागेल. आयपीएलमध्ये सात हजार धावा पूर्ण करणारा तो जगातील दुसरा खेळाडू आहे.
साईसुदर्शनचा विक्रम
या सामन्यात साई सुदर्शनने ऐतिहासिक कामगिरी करत आपले नाव आयपीएलच्या दिग्गजांमध्ये नोंदवले आहे. एकाच हंगामात ७०० हून अधिक धावा करणारा इतिहासातील केवळ ९ वा खेळाडू ठरला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तो आयपीएल २०२५ मध्ये ७०० धावांचा टप्पा गाठणारा पहिला खेळाडू बनला आहे, त्यामुळे ऑरेंज कॅप देखील सध्या त्याच्याच डोक्यावर आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यापूर्वी सुदर्शनने १४ सामन्यांमध्ये ६७९ धावा केल्या होत्या. मुंबईविरुद्धच्या सामन्यात २१ धावा करताच त्याने ७०० धावांचा टप्पा पार केला आहे. त्याच्यापूर्वी विराट कोहली आणि शुबमन गिल हेच असे २ भारतीय फलंदाज आहेत, ज्यांनी एका आयपीएल हंगामात ७०० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.
एका हंगामात ७००+ धावा करणारे खेळाडू
विराट कोहली - ९७३ धावा (२०१६)
शुबमन गिल - ८९० धावा (२०२३)
जोस बटलर - ८५३ धावा (२०२२)
डेविड वॉर्नर - ८४८ धावा (२०१६)
साईसुदर्शन-७५९ धावा (२०२५)
विराट कोहली - ७४१ धावा (२०२४)
केन विल्यम्सन - ७३५ धावा (२०१८)
ख्रिस गेल - ७३३ धावा (२०१२)
मायकल हसी - ७३३ धावा (२०१३)
फॅफ डु प्लेसिस - ७३० धावा (२०२३)
ख्रिस गेल - ७०८ धावा (२०१३)
आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज
३५७ – ख्रिस गेल (१४१ डाव)
३००* – रोहित शर्मा (२६६ डाव)
२९१ – विराट कोहली (२५८ डाव)
२६४ – एम.एस. धोनी (२४२ डाव)
२५१ – एबी डिव्हिलियर्स (१७० डाव)

आयपीएलमध्ये ७००० धावा करणारे फलंदाज
विराट कोहली – ८६१८ धावा : २६६ सामने
रोहित शर्मा – ७००० धावा : २७१ सामने
शिखर धवन – ६७६९ धावा : २२२ सामने
डेव्हिड वाॅर्नर – ६५६५ धावा : १८४ सामने
सुरेश रैना – ५५२८ धावा : २०५ सामने