वरिष्ठ व पॅरा एशियन कराटे चॅम्पियनशिप : थायलंडसोबत झालेल्या लढतीत ५-२ने विजय
पणजी : उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे पार पडलेल्या वर्ल्ड कराटे फेडरेशनची मान्यता असलेल्या एशियन कराटे फेडरेशन आयोजित २१व्या वरिष्ठ व पॅरा एशियन कराटे चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या भुवनेश्वरी जाधव (शिरोडा, फोंडा) हिने ऐतिहासिक कामगिरी केली. वैयक्तिक कुमिते प्रकारात कांस्यपदक जिंकून देशाच्या अधिकृत कराटे इतिहासात प्रथमच एशियन स्तरावर पदक खेचून आणले आहे.
आशिया खंडातील सोळा बलाढ्य देशांच्या कराटे अॅथलीट्सपैकी पूल क्रमांक दोनमधून भुवनेश्वरीने आपला दबदबा निर्माण केला. पहिल्या फेरीत तिने जागतिक क्रमवारीत ३२व्या स्थानावर असलेल्या आणि गत एशियन गेम्समधील कांस्यपदक विजेत्या जॉर्डनच्या अॅथलीटला ६-४ गुणांनी धूळ चारली.
त्यानंतर दुसऱ्या फेरीत, तिने चीनच्या जागतिक क्रमवारीत दहाव्या क्रमांकावरील खेळाडू आणि गत एशियन गेम्स रौप्यपदक विजेतीला १०-७ अशा फरकाने पराभूत करत सर्वांनाच थक्क केले. उपांत्य फेरीत जपानची जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेली अॅथलीट समोर २-७ गुणांनी हार मानावी लागली. मात्र, तिने थायलंडसोबत ५-२ अशा गुणांनी विजय मिळवला आणि भारतासाठी हे ऐतिहासिक पदक जिंकले.
गेल्या वर्षी दक्षिण आशिया स्पर्धेत झालेल्या गंभीर दुखापतीमुळे केलेल्या शस्त्रक्रियेनंतरही भुवनेश्वरीने जिद्द सोडली नाही. वर्षभर मलेशिया व उझबेकिस्तान येथे विविध कौशल्यांचा सराव केला.
भारतीय प्रशिक्षक कीर्तन कोंड्रू यांनी आशियाई प्रशिक्षक अरिवलन यांच्यासह पूर्ण रणनीती आखली. आहार, व्यायाम, योग यांची काटेकोर रचना करत अनेक वर्षांची भारताची पदकांची अपेक्षा पूर्ण केली.
या यशामागे अनेक व्यक्तींचा खंबीर पाठिंबा असल्याचे भुवनेश्वरीने सांगितले. त्यात सद्गुरू गोविंददेव गिरी, आर. आर. वायर्सचे महेंद्र काबरा, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, क्रीडामंत्री गोविंद गावडे, ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक, सहकार मंत्री सुभाष शिरोडकर, गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या संचालक गीता नागवेकर, क्रीडा व युवा संचालनालयाचे संचालक अरविंद खुटकर व शिरोड्याच्या सरपंच पल्लवी मेघश्याम, ट्रेडिशनल कराटे असोसिएशन ऑफ गोवाचे सूरज काकुलो व जोसेफ रॉड्रिग्ज आणि आई संगीता व स्वर्गीय वडील सुरेश जाधव यांचा समावेश आहे.
कराटे ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष भरत शर्मा, सचिव संजीव जांगरा यांनी भुवनेश्वरीचे विशेष कौतुक करत दीड लाखांचे बक्षीस घोषित केले आहे.