पोटच्या मुलीवरील अत्याचारप्रकरणी दोषी वडिलाला दिलासा देण्यास नकार
नवी दिल्ली : सात वर्षांच्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या डॉक्टर वडिलाला कोणतीही दया दाखवता येणार नाही, अशी कठोर टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. शिक्षा कमी करण्याची विनंती करणारी आरोपी डॉक्टरची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली.
न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, वडिलांविरुद्ध सात वर्षांची मुलगी खोटं बोलेल, यावर विश्वास ठेवता येत नाही. मुलीच्या जबाबात कुठलाही विरोधाभास नाही. त्यामुळे अशा विकृत मानसिकतेच्या व्यक्तीची शिक्षा माफ करता येणार नाही.
मद्यधुंद अवस्थेत केले राक्षसी कृत्य
भूतपूर्व पत्नीने मुलीला चुकीचे जबाब देण्यास प्रवृत्त केले असा युक्तिवाद आरोपी डॉक्टरने केला होता. मात्र न्यायालयाने आरोपीचे हे म्हणणेही फेटाळले. पीठाने नमूद केले की, आम्ही अनेकदा सहानुभूती दाखवतो, पण या प्रकरणात त्यास जागा नाही. मद्यधुंद अवस्थेत माणूस राक्षसासारखे वागतो आणि अशा घटना गंभीर चिंता निर्माण करणाऱ्या आहेत.
प्रकरण काय आहे?
मार्च २०१८ मध्ये आरोपी डॉक्टरने आपल्या मुलीला काही दिवस आपल्या सोबत ठेवले होते. परत आल्यानंतर मुलीने आईला सांगितले की वडिलांनी तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. पीडितेच्या आईने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला. नंतर न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. सर्वोच्च न्यायालयाने आरोपीची याचिका फेटाळत शिक्षा कायम ठेवली आहे.