ब्रह्मकरमळी ब्रह्मदेव देवस्थानमध्ये चोरी
वाळपई : ब्रह्मकरमळी येथील ब्रह्मदेव देवस्थानची फंडपेटी फोडून चोरी करण्यात आली होती. ग्रामस्थ, भाविक व देवस्थान समितीने पोलीस खात्याला संशयिताला अटक करण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली होती. मात्र, या प्रकरणाचा अवघ्या १२ तासांमध्ये वाळपई पोलिसांनी तपास लावला आहे.
चोरी प्रकरणामध्ये नानोडा येथील विशाल उर्फ विश्वास झर्मेकर (नानोडा सत्तरी) याला अटक करण्यात आली. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी झाडानी येथील बसवेश्वर मंदिराची मोडतोड करणे, फंडपेटीची चोरी करणे, देवस्थानच्या परिसराला आग लावण्याच्या प्रकारांमध्येही याच संशयिताचा सहभाग असण्याची शक्यता भाविकांनी व्यक्त केली आहे.
विशाल झर्मेकर याचा अनेक प्रकरणांमध्ये सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डिचोली उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक या अधिकाऱ्यांनी तपासाला गती दिली. देवस्थानची फंडपेटी फोडण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर उत्तर गोव्याच्या पोलीस अधीक्षकांनी पोलीस निरीक्षक विजय राणे, उपअधीक्षक विल्सन डिसोझा, वाळपई पोलीस निरीक्षक शिरोडकर यांना या प्रकरणांमध्ये तातडीने लक्ष घालण्याचे निर्देश दिले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असलेल्या व्यक्तीशी ओळख पटविण्यात आली. संशयिताने फंडपेटी फोडण्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसला संशयित
देवस्थानामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेरामध्ये रात्री ९.३० ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत संशयित फंडपेटी फोडून त्यातील पैसे चोरत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर तो मनोरुग्ण असून सातत्याने चोरी करीत असल्याची माहिती उपलब्ध झाली.