चारधाम यात्रेला निघालेल्या पाच भाविकांचा मृत्यू, दोघे गंभीर
उत्तरकाशी: उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात चारधाम यात्रेला निघालेल्या भाविकांचे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एरो ट्रिंक कंपनीचे सात आसनी हेलिकॉप्टर भाविकांना घेऊन चारधाम यात्रेसाठी निघाले होते. मात्र गुरुवारी सकाळी खराब हवामानामुळे गंगोत्रीलगतच्या भगीरथी नदीजवळ हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये सात जण होते. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. गढवाल विभागीय आयुक्त विनय शंकर पांडे यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
घटनास्थळी पोलीस, आर्मी, आपत्ती व्यवस्थापन पथक, रुग्णवाहिका पोहोचले असून स्थानिक प्रशासकीय अधिकारीही दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये खराब हवामान आहे. हवामान विभागानेही वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. चारधाम यात्रेच्या मार्गावर अनेक ठिकाणी पाऊस झाला असून काही ठिकाणी गारपीटही झाली आहे.