कुंकळ्ळी :चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात

ट्रक संरक्षक कठड्याला ठोकरून देऊन थेट रस्त्याबाजूच्या घराला धडकला.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
07th May, 03:48 pm
कुंकळ्ळी :चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात

मडगाव : कुंकळ्ळी येथे मंगळवारी रात्री मासळीची वाहतूक करणाऱ्या ट्रकची घराला धडक दिली. दरम्यान ट्रकमध्ये अडकून पडलेल्या ट्रक चालकाला पोलीस व अग्निशामक दलाने बाहेर काढले. तसेच घराच्या भिंतीचे चिरे अंगावर पडल्याने घरातील एक व्यक्तीही जखमी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मडगाव येथून काणकोणच्या दिशेने जाणारा मासळीवाहू इन्सुलेटेड ट्रकचालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी रस्त्या बाजूच्या संरक्षक भिंतीला धडक देऊन त्यानंतर नजीकच्या घराला जाऊन धडकली.  हा अपघात महामार्गावर घालण्यात आलेल्या रम्बलरचा अंदाज न आल्याने गाडी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने झाल्याचे सांगण्यात येत आहे.  अपघातानंतर गाडी चालक ट्रकमध्येच दबल्याने अडकून पडलेला होता. ट्रकची घराला धडक बसल्याने भिंत कोसळली व भिंतीच्या बाजूलाच मोबाईल पाहत बसलेल्या सतीश लोटलीकर नामक व्यक्तीला दुखापत झालेली आहे. 

 घरातील भिंत मोडली व चिरा पायावर पडल्याने जखमी झालेल्या लोटलीकर यांना तत्काळ बाळ्ळी आरोग्य केंद्रात नेण्यात आले. दरम्यान  गाडीत अडकून पडलेल्या ट्रक चालकाला बाहेर काढण्याचा स्थानिकांचा प्रयत्न असफल ठरला त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी हायड्रॉलिक उपकरणांचा वापर करून ट्रक चालकाला गाडीतून बाहेर काढण्यात आले. त्यालाही उपचारासाठी बाळ्ळी येथील आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले.


हेही वाचा