पणजी : पेडणे पोलिस स्थानकाच्या हद्दीत आता उगवे, मोपा, तांबोसे व तुयें या गावांचा समावेश होणार आहे. गृह खात्याने यासाठी दोन वेगवेगळ्या अधिसूचना जारी केल्या आहेत. उगवें, मोपा व तांबोसे या तीन गावांचा समावेश मोपा विमानतळ पोलीस स्थानकात करण्यात आला होता. या विषयीची अधिसूचना सरकारने २२ जून २०२२ रोजी जारी केली होती.
मोपा विमानतळ पोलीस स्थानकाची हद्द निश्चित करणाऱ्या या अधिसूचनेत आता दुरूस्ती करण्यात आली आहे. उगवे, मोपा व तांबोसे हे तिन्ही गाव यापुढे मोपा विमानतळ पोलीस स्थानकाच्या हद्दीतून बाहेर काढण्यात आले आहेत. हे तिन्ही गाव आता पेडणे पोलीस स्थानकाच्या हद्दीत येतील, असे नवीन अधिसूचनेत म्हटले आहे.
तसेच मांद्रे पोलिस स्थानकाच्या हद्दी विषयीची अधिसूचना १५ डिसेंबर २०२३ रोजी जारी करण्यात आली होती. या अधिसूचनेत आता दुरूस्ती करण्यात आली असून तुयें गाव मांद्रें पोलीस स्थानकाच्या हद्दीतून काढून तो पेडणे पोलीस स्थानकात घालण्यात आला आहे. या दोन्ही अधिसूचनेमुळे पेडणे पोलिस स्थानकात आता उगवे, मोपा, तांबोसे व तुये या चार गावांची भर पडली आहे. या नवीन अधिसूचनेनंतर मोपा विमानतळ पोलीस स्थानकाच्या हद्दीत आता वारखंड, नागझर, तोर्से, पत्रादेवी, वझरी, कासारवर्णे व हसापूर हे सात गाव असतील.
तसेच मांद्रे पोलीस स्थानकाच्या हद्दीत पूर्वी अकरा गावे होती. तुये वगळण्यात आल्याने मांद्रे - केरी, तेरेखोल, पालये, किरणपाणी, हरमल, मांद्रे, मोरजी, आगरवाडा, चोपडे व पार्से ही दहा गावे आहेत.
बातमी अपडेट होत आहे.