सर्वपक्षीय एकी आवश्यक

जगाला भारताची ताकद, एकता दाखविण्यासाठी सर्वांनीच केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्यासोबत राहण्याची गरज आहे. जागतिक पातळीवर भारताची भूमिका बळकट करण्यासाठी सर्वपक्षीय एकी आवश्यक आहे.

Story: अग्रलेख |
11 hours ago
सर्वपक्षीय एकी आवश्यक

पहलगाममध्ये पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर हल्ला केल्यानंतर भारतातील सुरक्षा यंत्रणा, सरकार आणि विरोधी पक्षही एकमतानेच पाकिस्तानला याचे प्रत्युत्तर देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. देशाच्या सुरक्षेच्या विषयावर सर्व पक्षांचे एकमत हीच भारताची खरी शक्ती आहे. पर्यटकांना लक्ष्य करून दहशतवाद्यांनी काही स्थानिकांच्या मदतीने पहलगाममध्ये हल्ला केला. त्यात २६ पर्यटकांना जीव गमवावा लागला. निष्ठूरपणे दहशतवाद्यांनी गोळीबार केला. पर्यटकांना गोळ्या घालण्यापूर्वी त्यांचा धर्म विचारला, ज्यांना जिवंत सोडण्यात आले त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाऊन सांगा असे सांगण्यात आले. कोणी 'कलमा' वाचला तर त्याला जीवदान दिले गेले. या हल्ल्यामुळे दहशतवाद्यांनी हिंदूनाच लक्ष्य केल्याची भावना बनली आहे. देशात घुसून इथे भारतीय नागरिकांना ठार करून देशाच्या सुरक्षा यंत्रणेला आव्हान दिले गेले. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी पाकिस्तानात आश्रय घेतला. जम्मू काश्मीरमधील ज्या दोन स्थानिक दहशतवाद्यांनी सीमेपलिकडील दहशतवाद्यांना मदत केली त्यांची घरे नष्ट करण्यात आली. एका घरावर बुलडोझर लावला तर दुसऱ्याचे घर स्फोटाने उडवले. भारताकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या प्रत्येकाला हा धडा मिळेल, याहीपेक्षा मोठी कठोर शिक्षा मिळेल, असेच सरकारने दाखवून दिले आहे.

दहशतवाद ही देशासमोरील एक गंभीर समस्या आहे. त्यावर दीर्घकालीन उपाय करण्याची वेळ आली आहे. कुठलाच देश आपल्या देशात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यानंतर गप्प बसलेला नाही. अमेरिका असो किंवा इस्रायल. देशाची सुरक्षा महत्त्वाची. देश प्रथम या भावनेने प्रसंगी घरात घुसून दहशतवाद्यांना, त्यांच्या म्होरक्यांना कंठस्नान घातल्याचा इतिहास आहे. पहलगामपूर्वीही देशात दोन मोठे दहशतवादी हल्ले झाले. उरी आणि पुलवामा. त्यावेळीही भारतीय लष्कराने पाकिस्तानला योग्य धडा शिकवला होता. पण त्यातून पाकिस्तानही शिकलेले नाही आणि तिथे आश्रयास असलेल्या दहशतवाद्यांनीही बोध घेतला नाही. पहलगामचा हल्ला हा बदलत्या काश्मीरच्या स्थितीवर होता. जम्मू आणि काश्मीरमध्ये होत असलेला विकास, तिथे होत असलेले बदल हे दहशतवाद्यांच्या आणि पाकिस्तानच्या डोळ्यात खुपत असल्यामुळेच हा भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या या दुष्कृत्याला तेवढेच कठोर उत्तर भारताकडून दिले जाईल असे सर्वांना अभिप्रेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, त्यात सर्व पक्षांच्या नेत्यांनी देशाच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिले. सर्वपक्षीय सरकारच्या पाठीशी असल्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.

दहशतवादाचा परिणाम नेहमी देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर तसेच राष्ट्रीय ऐक्य आणि अखंडतेवर होतो. जम्मू-काश्मीरसह देशात शांतता बिघडवण्यासाठी होत असेलल्या सीमेपलिकडच्या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी दहशतवादाच्या विरोधात सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. ते ऐक्य देशातील राजकीय पक्षांनी दाखवले आहे. किंबहुना काँग्रेस, आम आदमी पक्ष, तृणमूल या सर्वच पक्षांनी देशाच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने निर्णय घ्यावे असे सुचवले आहे. देशातील लोकशाही व्यवस्थेत विविध राजकीय पक्षांची वेगवेगळी विचारधारा आहे, पण देशाच्या सुरक्षेच्या बाबतीत सर्वांनी एकत्र राहणे आवश्यक आहे. दहशतवादी हल्ला हा कुठल्या एका राजकीय पक्षावर किंवा सरकारवर नाही तर तो संपूर्ण देशावर असतो. अशावेळी राजकारणापेक्षा राष्ट्रहित महत्त्वाचे असते. तेच सर्व पक्षांनी ओळखले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पक्षांनी देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले. पण ही त्रुटींवर राजकारण करण्याची वेळ नाही. त्यामुळेच सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा, असे सर्वांनीच या बैठकीत सांगितले आहे. फक्त पाकिस्तानला नव्हे तर जगाला भारताची खरी ताकद दाखवून देण्याची ही वेळ आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून राज्यांमध्ये एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. जे पाकिस्तानी नागरिक व्हिसावर आहेत त्यांनी ४८ तासांत देश सोडावा, असे केंद्राने आधीच जाहीर केले होते. तरीही कुठे पाकिस्तानी नागरिक असतील तर त्यांना त्वरित पाकिस्तानात पाठवण्याची तयारी राज्यांनीही चालवली आहे. कुठल्याही प्रसंगी युद्धजन्य स्थिती निर्माण होऊ शकते, याची जाणीव असल्यामुळे नौदल, हवाई दलाच्या कवायती सुरू झाल्या आहेत. जगाला भारताची ताकद, एकता दाखविण्यासाठी सर्वांनीच केंद्र सरकार जो निर्णय घेईल त्यासोबत राहण्याची गरज आहे. जागतिक पातळीवर भारताची भूमिका बळकट करण्यासाठी सर्वपक्षीय एकी आवश्यक आहे.