मडगाव : फातर्पा येथील मंदिराच्या साफसफाईसाठी उंचावर चढलेले डायगो फर्नांडिस (५७, रा. फातर्पा, केपे) यांचा तोल गेल्याने ते जमिनीवर पडले. जखमी डायगो यांचा गोमेकॉमध्ये मृत्यू झाला. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
कुंकळ्ळी पोलिसांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळातून आपत्कालीन विभागात उपचार घेत असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत फातर्पा येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण मंदिराच्या साफसफाईचे काम सुरू असताना सफाईसाठी डायगो फर्नांडिस हे उंचावर चढले होते. सफाईवेळी तोल गेल्याने डायगो उंचावरुन जमिनीवर पडले व त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तत्काळ मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेण्यात आले. त्याठिकाणाहून गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकार्यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. शवचिकित्सा केल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. कुंकळ्ळी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. कुंकळ्ळी पोलीस निरीक्षक डायगो ग्रॅसिअस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साहील पागी यांच्याकडून तपास केला जात आहे.