बनावट मृत्यूपत्राद्वारे २.८० लाख चौ.मी. जमीन हडप

म्हापसा पोलिसांकडून गुन्हा नोंद : ब्रोकरसह इतर संशयितांचा समावेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th April, 11:46 pm
बनावट मृत्यूपत्राद्वारे २.८० लाख चौ.मी. जमीन हडप
मोठी बातमी 📢 म्हापसा पोलिसांची कारवाई

🔴 म्हापसा : खोर्जुवे-बार्देश येथील स्वर्गीय अनंत नारायण कामत यांच्या नावे बनावट मृत्यूपत्र व बोगस कागदपत्रे तयार करून तसेच इतर वारसदारांचा विश्वासघात करत सुमारे २ लाख ८० हजार चौ.मी. जमीन फसवणुकीने हडप केल्याच्या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी एका जमीन ब्रोकरसह सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

🧑‍⚖️ गुन्हा दाखल झालेले संशयित

जमीन ब्रोकर विशांत कामत, सुहासिनी पडवळ, प्रकाश महांब्रे, वामन श्रीधर पोळे, देविदास गोपीनाथ पणजीकर आणि इतरांचा समावेश आहे.

📝 तक्रारदार

रिचा रूपेश शिरोडकर, शैलेश श्रीकृष्ण महांब्रे, राजेश वसंत शिरोडकर, रिया राजेश शिरोडकर, रूपेश वसंत शिरोडकर, नीलेश वसंत शिरोडकर, नेहा नीलेश शिरोडकर (रा. पत्रादेवी-तोरसे), राधाकृष्ण दत्ताराम शेटये, शुभांगी राधाकृष्ण शेटये (रा. तोरसे-पेडणे), विजय काशिनाथ मंत्री, विजया विजय मंत्री (रा. आरवली-सिंधुदुर्ग), वामन वासुदेव महांब्रे, स्मिता वामन महांब्रे (रा. सोनारभाट साळगाव), प्रिया कृष्णा पै, कृष्णा विश्वनाथ पै (रा. भोम माशेल), संध्या शैलेश महांब्रे, सुगंधा श्रीकृष्ण महांब्रे (रा. क्रांतीनगर पर्वरी) यांनी तक्रार दाखल केली आहे.

⏳ प्रकाशात आलेली वस्तुस्थिती

हा प्रकार नोव्हेंबर २०२४ पूर्वी घडल्याचे समोर आले आहे. तक्रारदारांचे वारसदार असलेले स्व. अनंत कामत यांचे मे २०२१ मध्ये, तर त्यांची पत्नी स्व. प्रभावती कामत यांचे जून २००९ मध्ये निधन झाले होते. त्यांना मुल नव्हते, तसेच अनंत कामत यांचे अविवाहित बंधूही दिवंगत झाले आहेत. त्यांच्या तीन बहिणी विवाहित असून, मयत दाम्पत्याने कोणतेही अधिकृत मृत्यूपत्र तयार केले नव्हते.

🏚️ जमिनीचा तपशील

तरीही, संशयितांनी बनावट मृत्यूपत्र तयार करून सर्वे क्र. ५२/०, ५१/३, ५०/७, १००/७, १००/१, ५३/८, ५५/८, ५५/९, २८/१ (भाग), १४०/१ (भाग) मधील एकूण २.८० लाख चौ.मी. जमीन बळकावली.

⚖️ नोटरीवर आरोप

हे बनावट मृत्यूपत्र मुंबईतील नोटरी आर.बी. गुप्ता व अॅड. पी.के. पाठक यांच्या संगनमताने तयार करण्यात आले असल्याचा आरोप फिर्यादींनी केला आहे. त्यामुळे संबंधित नोटरी व वकिलांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

📌 प्रकरणाची संक्षिप्त माहिती

  1. स्वर्गीय अनंत कामत यांचे बनावट मृत्यूपत्र व बोगस कागदपत्रे तयार करून २.८० लाख चौ.मी. जमीन फसवणुकीने बळकावल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
  2. जमीन ब्रोकर विशांत कामत यासह सुहासिनी पडवळ, प्रकाश महांब्रे, वामन पोळे, देविदास पणजीकर आदी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल.
  3. दिवंगत कामत दाम्पत्याचे कोणीही वारसदार नसतानाही मृत्यूपत्र तयार झाल्याचा दावा; विविध ठिकाणच्या १८ तक्रारदारांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
  4. बनावट मृत्यूपत्र मुंबईतील नोटरी व वकिलांच्या संगनमताने तयार केल्याचा आरोप; पोलिसांनी भा.दं.वि.च्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू.