गूळ उत्पादनालाही पसंती : संजीवनी साखर कारखाना बंद असल्याने शोधले पर्याय
पणजी : गोव्यातील एकमेव संजीवनी साखर कारखाना बंद झाल्याने उस उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले. त्यामुळे त्यांनी आता उसाऐवजी भाजीपाला व फळबागा यांकडे वळण्यास सुरुवात केली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी उसावर आधारित पारंपरिक शेती सोडून घरगुती गूळ तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे, अशी माहिती कृषी संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यातील एकमेव साखर कारखाना असलेल्या संजीवनी कारखान्याचा भविष्यकाळ सध्या अंधारात आहे. सरकारने येथे इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला असला तरी अद्याप कंत्राटदार पुढे न आल्याने हा प्रकल्पही रखडला आहे. त्यामुळे कारखाना पुन्हा सुरू होण्याची शक्यता अल्प असून त्याचा थेट परिणाम उस उत्पादनावर झाला आहे.
उस उत्पादनात सातत्याने घसरण
कारखाना बंद असल्याने उस उत्पादकांमध्ये निराशा व अनिश्चितता वाढली असून याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे.
२०२२-२३ मध्ये ४९१ हेक्टरवर उसाची लागवड झाली होती. २०२३-२४ मध्ये ही आकडेवारी घसरून ४४६ हेक्टरवर आली. २०२४-२५ मध्ये ती आणखी कमी होऊन ३९८ हेक्टरवर पोहोचली.
तसेच दर हेक्टर उस उत्पादनातही घसरण झाली. २०२२-२३ मध्ये उसाचे उत्पादन प्रति हेक्टर ६२.११ टन होते. तर २०२३-२४ मध्ये ते प्रति हेक्टर ५७ टनांपर्यंत घसरले आणि प्रति हेक्टर ५.४८ टनांची घट नोंदवण्यात आली. २०२४-२५ मध्ये, उसाचे पीक प्रति हेक्टर ५४ टन होते आणि यावर्षी उत्पादनात प्रति हेक्टर ३.५३ टनांची घट झाली.
गूळ बनविण्यावर भर
उत्तर गोव्यात बार्देस आणि सत्तरी आणि दक्षिण गोव्यात सांगे, धारबांदोडा, काणकोण आणि केपे येथे ऊस पिकवला जातो. या भागातील बहुतेक शेतकऱ्यांनी आता ऊस पिकवणे बंद केले आहे. बहुतेक शेतकरी आता त्यांच्या शेतात भाज्या आणि फळे पिकवतात. पेडणे येथील शेतकऱ्यांनी ऊसाऐवजी केळी लागवड सुरू केली आहे. तर पेडणे आणि सांगे तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसाच्या रसापासून गूळ बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे.
२०२३-२४ मध्ये एकूण ४४६ हेक्टरवर ऊस लागवड:
उत्तर गोव्यात: १४ हेक्टर (पेडणे - ५, सत्तरी - ९ हेक्टर)
दक्षिण गोव्यात: ४३२ हेक्टर (सांगे - २९४, धारबांदोडा - २९, काणकोण - ४३, केपे - ६६ हेक्टर)