बस स्टँड ते बालभवन तिकीट २० रुपये, कदंब स्टँडला अनावश्यक प्रदक्षिणा
पणजी: स्मार्ट सिटीमध्ये धावणाऱ्या ई-बसच्या तिकिटांमध्ये गुरुवारपासून वाढ करण्यात आली आहे. काही थांबे रद्द करण्यात आले असून तिकिटांची कमतरता भरून काढण्यासाठी 'मार्ग बदल' या नावाखाली सकाळी कदंब बसस्थानकावर उलट मार्गी प्रदक्षिणा घालण्याचा अजब प्रकार सुरू आहे. विशेषतः सकाळी पणजी बस स्थानकावरून सुटणाऱ्या बसेस या नव्या नियमाचे पालन करत आहेत. याबाबत कंडक्टर आणि ड्रायव्हरला विचारले असता ते 'तुम्ही कदंब डेपोमध्ये जाऊन विचारा' असा पवित्रा घेतात. दरम्यान, कदंब डेपोचे लँडलाईन नादुरुस्त असल्याचा संदेश ऐकू येतो.
पणजी बस स्टँडवरून लगतच्या प्रवासासाठी १० रुपये तिकिट आकारत होते. तथापि, बी १ मार्गावरील बसेस आता बस स्टँडपासून सांतिनेज अग्निशमन दलापर्यंतच्या प्रवासासाठी २० रुपये आकारत आहेत. कार्डमधून १८ रुपये वजा केले जातात.
बसेस बस स्टँडवरून निघतात आणि पाटो ब्रिज, पर्यटन भवन, सेंट्रल लायब्ररी, आयकर भवन, मांडवी ब्रिज मार्गे मारुती मंदिराकडे येतात आणि नंतर पार्किंग इमारतीपासून नेहमीच्या मार्गाने जातात. डेपो अधिकाऱ्यांनी आम्हाला याच मार्गाने जाण्यास सांगितले आहे. किलोमीटर भरले पाहिजेत, तुम्ही हवं तर डेपोमध्ये जाऊन विचारा," असे उत्तर एका कंडक्टरने दिले.
बसस्थानकाला प्रदक्षिणा
विशेष म्हणजे बसस्थानकातून बाहेर पडल्यानंतर जेव्हा बस बसस्थानकाला वळसा घालते तेव्हा त्या मार्गावर एकही प्रवासी उतरत नाहीत. प्रवासाला किमान सात ते दहा मिनिटे लागतात. जर वाहतूक कोंडी असेल तर २० मिनिटे जातात. ही नवीन पद्धत कोणी सुरू केली हे माहीत नाही.
बस स्टँडपासून आयकर भवनापर्यंत चालण्यासाठी पाच मिनिटे पुरेशी आहेत. तो प्रवासी १० रुपये देऊन का जाईल? सध्या खाजगी बसेस प्रति तिकिट १५ रुपये आकारतात, परंतु आता ई-बसेसनेही २० रुपये आकारण्यास सुरुवात केली आहे. याचा फटका कदंब कॉर्पोरेशनला बसेल, असे एका प्रवासी महिलेने सांगितले.
मार्ग बदलणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव जाहीर करा!
स्मार्ट सिटीमध्ये धावणाऱ्या ई-बसच्या तिकिटांमध्ये वाढ करण्यात आली असेल तर ती पत्रकार परिषदेत जाहीर करायला हवी होती. किलोमीटरप्रमाणे तिकीट घ्यावे यासाठी ज्या मार्गावर एकही प्रवासी चढत नाही किंवा उतरत नाही, अशा मार्गाने बस नेणे की कल्पना ज्या अधिकाऱ्याला सुचली त्याचे नाव जाहीर करावे अशी मागणी संतप्त प्रवाशांनी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पणजी महानगरपालिकेनेही याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.