नोकरीसाठी महिन्याला सरासरी ४२ गोमंतकीय विदेशात

परराष्ट्र खात्याची माहिती : दहा वर्षांत सर्वाधिक ५.६० लाख इसी उत्तर प्रदेशातून


13th February, 11:35 pm
नोकरीसाठी महिन्याला सरासरी ४२ गोमंतकीय विदेशात

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : विदेशात जाऊन नोकरी करणाऱ्या गोमंतकीयांची संख्या अधिक आहे. मागील १० वर्षांच्या कालावधीत गोव्यातून विदेशात नोकरी करण्यासाठी ४,९८७ जणांना इमिग्रेशन क्लिअरन्स (इसी) देण्यात आले आहे. याचाच अर्थ वरील कालावधीत वर्षाला सरासरी ४९८, म्हणजेच महिन्याला सरासरी ४२ गोमंतकीय व्यक्ती नोकरीसाठी विदेशात जात आहेत. परराष्ट्र खात्याने याबाबत नुकतीच माहिती जारी केली आहे.
भारतीय व्यक्तीला ठरावीक ११ देशांत काम करण्यासाठी इमिग्रेशन चेक रिक्वायर्ड पासपोर्ट (इसीआर) घ्यावा लागतो. तसेच या पासपोर्टसाठी इमिग्रेशन क्लिअरन्स (इसी) असणेदेखील आवश्यक असते. १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान गोव्यातील ४,९८७ जणांना विदेशातील नोकरीसाठी इसी देण्यात आली आहे. याचाच अर्थ दिवसाला सरासरी एक व्यक्ती विदेशात नोकरीसाठी जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्ष २०१६ मध्ये ८३९ गोमंतकीयांना इसी देण्यात आली होती. २०१७ मध्ये ६६६, २०१८ मध्ये ६४१, २०१९ मध्ये ६२७, २०२० मध्ये १०५, २०२१ मध्ये २६२, २०२२ मध्ये ६२२, २०२३ मध्ये ४२०, २०२४ मध्ये ३७४, तर २०२५ मध्ये ४३१ जणांना अशा इसी देण्यात आल्या होत्या. संपूर्ण देशाची आकडेवारी पाहता वरील कालावधीत सर्वाधिक ५.६० लाख इसी या उत्तर प्रदेशमधून देण्यात आल्या होत्या.
भरती कंपन्यांविरोधात फसवणुकीच्या १९ तक्रारी
मिळालेल्या माहितीनुसार, २०२३ ते २०२५ दरम्यान विदेशांत नोकरी देण्याचे आमिष दाखवून फसवणाऱ्या गोव्यातील कंपन्यांविरोधात १९ तक्रारी देण्यात आल्या आहेत. यातील सर्वाधिक १३ तक्रारी २०२५ मध्ये देण्यात आल्या आहेत. २०२४ मध्ये याविषयी एफआयआर दाखल करण्यात आली होती.
सहा महिन्यांत २६ गोमंतकीयांना केले ‘डिपोर्ट’
मिळालेल्या माहितीनुसार, यूएसएने २० जानेवारी ते २२ जुलै या कालावधीत एकूण १,७०३ भारतीय नागरिकांना परत भारतात पाठवले, म्हणजेच डीपोर्ट केले. यामध्ये २६ गोमंतकीय व्यक्ती होत्या. डिपोर्ट झालेल्या सर्वाधिक २४६ व्यक्ती गुजरातमधील होत्या. त्यानंतर उत्तर प्रदेश (३८), गोवा (२६), महाराष्ट्र (२०), तेलंगणा (१९) या राज्यातील व्यक्तींना डिपोर्ट करण्यात आले होते.