पणजी : राज्यात संभाव्य सुरक्षा धोक्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त आणि गस्त वाढवण्यात आली आहे. दरम्यान, जुने गोवे पोलिसांनी चिंबल, मेरशी आणि सांताक्रूझ परिसरात व्यापक कॉम्बिंग ऑपरेशन राबवले. या कारवाईत २५२ जणांना ताब्यात घेण्यात आले, यापैकी २१ जणांना प्रतिबंधात्मक अटकेत ठेवण्यात आले असून, १२ जणांवर अन्य प्रकारे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
याच प्रमाणे, पर्वरी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील मॉल दी गोवा येथे काल रात्री पोलीस निरीक्षकांनी मॉलच्या सुरक्षा रक्षकांना सुरक्षाविषयक सर्व बाबींवर सविस्तर सूचना दिल्या. राज्यातील विविध भागात याप्रकारच्या कारवाया पार पडल्या. सार्वजनिक सुरक्षेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान पहलगाम दहशतवाडी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहखात्याने कडक पवित्रा अवलंबिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी सुरक्षेच्या विषयावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उच्च स्तरीय बैठक घेऊन राज्यातील सुरक्षेच्या स्थितीचा आढावा घेतला. मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, पोलीस अधिकारी, सीआयएसएफ, नौदल, तटरक्षक दल, जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
यावेळी सुरक्षेसाठी राज्यात कोम्बिंग ऑपरेशन तसेच अचानक नाकाबंदीसारखे निर्णय घेण्यात आले. आता विमानतळ, रेल्वे स्थानक, पर्यटन स्थळे, तसेच बसस्थानकांवर कडक सुरक्षाव्यवस्था ठेवली जाणार आहे. आठवडी बाजारात विक्रेत्यांची तपासणी केली जाईल. त्यांनी ओळखपत्र स्वतःजवळ ठेवणे आवश्यक आहे. राज्यात ८५६ ट्रॉलर्स आणि १,२०६ होड्या आहेत. ट्रॉलर, होड्यांच्या कामगारांवर नजर ठेवण्यासाठी कामगारांना बायोमेट्रिक कार्ड देण्याचाही प्रस्ताव आहे.
दरम्यान या बैठकीत राज्यात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांच्या मुद्यावर चर्चा झाली. यावेळी डिप्लोमॅटिक, सरकारी व एलटीव्हीशिवाय इतर प्रकारच्या व्हिसावर गोव्यात वास्तव्यास असलेल्या पाक नागरिकांना देश सोडण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. माहितीनुसार १७ पाकिस्तानी नागरिक एलटीव्ही व्हिसावर गोव्यात वास्तव्यास आहेत. यात हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन पुरुष आणि महिलांचा समावेश आहे. यातील काहींनी गोमंतकीय व्यक्तींशी विवाह केलेला आहे. पोलीस आणि प्रशासनाची या सर्वांवर करडी नजर असेल. सुरक्षेच्या उपायांना सहकार्य करून गोमंतकीयांनी धार्मिक सलोखा राखावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.