मासे खाणे थांबवा आणि मासेप्रेमी बना !

पेटा इंडियाचे गोव्यातील लोकांना आवाहन : जनजागृतीसाठी पेटातर्फे पणजीत अनोखा कार्यक्रम

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th April, 11:47 pm
मासे खाणे थांबवा आणि मासेप्रेमी बना !

पणजी: गोव्यातील लोकांना माशाशिवाय अन्नाचा एक घास जात नाही. पण पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट फॉर अ‍ॅनिमल्स (पेटा) यांनी गोव्यातील लोकांना मासे खाण्यापासून लांब राहण्याचे आवाहन केले आहे. जर गोव्याचे लोक खरे मासेप्रेमी असतील तर त्यांनी मासे खाऊ नयेत. पेटा इंडियाने गोव्यातील लोकांना माणसांवर जसे प्रेम करतात तसे त्यांच्यावर प्रेम करण्याचा सल्ला दिला आहे. 

लोकांनी मासे मारणे आणि खाणे थांबवावे हा संदेश देण्यासाठी पेटाने पणजीमध्ये अनोखा आगळ-वेगळा कार्यक्रम केला होता. मध्यभागी माशांच्या दोन आकृत्या ठेवण्यात आल्या होत्या ज्यांच्यामध्ये एका महिलेला जलपरीसारखे कपडे घातले होते आणि ती मृत असल्यासारखे दाखवण्यात आले होते. 

याप्रसंगी बोलताना पेटा इंडियाचे समन्वयक उत्कर्ष गर्ग म्हणाले की, जर गोव्यातील लोकांना मासेप्रेमी म्हटले जात असेल तर त्यांनी ते प्रेम दाखवले पाहिजे. आपण माणसांवर प्रेम करतो, म्हणून माणसे खात नाही, म्हणून जर आपण मासे खाल्ले तर आपण स्वतःला मासेप्रेमी म्हणू शकत नाही. अन्नासाठी त्यांना मारणे योग्य नाही. जगभरात अन्नासाठी एक अब्जाहून अधिक मासे मारले जातात. 


संरक्षित प्राण्यांची देखील कत्तल
समुद्रातील काही जीवांचा (जसे की, कासव, देवमासा) याआधी अन्नासाठी वापर केला जात नसे. मात्र या सागरी जीवांची देखील सध्या कत्तल केली जात आहे. या जीवांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत संरक्षण दिले गेले आहे.


समुद्रातील माशांमुळे विविध आजार
मासे खाल्ल्याने विविध आजार होऊ शकतात. माशांमध्ये मोठ्या प्रमाणात कोलेस्टेरॉल असते आणि समुद्रातील प्रदूषणामुळे माशांमध्ये सूक्ष्म प्लास्टिक, आर्सेनिक आणि पारा रसायनांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मानवांमध्ये भयानक आजार होऊ शकतात. स्वतःची, निसर्गाची आणि निष्पाप प्राण्यांची काळजी घेण्यासाठी मासे खाणे थांबवा, असे गर्ग यांनी आवाहन केले.