अश्वेक गिमोणकर उत्कृष्ट दिग्दर्शक : 'जनेल'ला दुसरे, 'काणी तशीच जुनी… पुण'ला तिसरे पारितोषिक

पणजी : कला अकादमीच्या ५० व्या कोकणी नाट्य स्पर्धेत ‘भोगपर्व’ या नाटकाने अव्वल स्थान पटकावले. सियावर राम गिमोणे-डिचोली यांनी बसवलेल्या या नाटकाचे दिग्दर्शक अश्वेक गिमोणकर यांना उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी प्रथम पारितोषिक मिळाले. या स्पर्धेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला.
कला अकादमी गोवा आयोजित २०२५-२६ च्या ५० व्या कोकणी नाट्य स्पर्धेत नाट्यप्रयोग श्रेणीत ‘भोगपर्व’ला पहिले पारितोषिक मिळून १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले. रसरंग उगवे प्रस्तुत ‘जनेल’ या नाटकाला दुसरे पारितोषिक (७५ हजार रुपये) आणि श्री सातेरी कलामंच, मोर्ले-सत्तरी प्रस्तुत ‘काणी तशीच जुनी… पुण’ या नाटकाला तिसरे पारितोषिक (५० हजार रुपये) जाहीर झाले.
अंत्रुज घुडयो, बांदोडे-फोंडा प्रस्तुत ‘बापू-गांधी’ व हौसिंग बोर्ड कॉलनी रेसीडन्स असोसिएशन, साखळी प्रस्तुत ‘अस्तुरी’ या दोन्ही नाटकांना उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येऊन प्रत्येकी २५ हजार रुपये जाहीर करण्यात आले.
दिग्दर्शन विभागात ‘भोगपर्व’चे दिग्दर्शक अश्वेक गिमोणकर यांना १० हजार रुपयांचे पहिले बक्षीस देण्यात आले. ‘जनेल’चे दिग्दर्शक निलेश महाले यांना ७ हजारांचे दुसरे पारितोषिक, तर ‘काणी तशीच जुनी… पुण’चे दिग्दर्शक शाबलो गावकर यांना ५ हजारांचे तिसरे पारितोषिक देण्यात आले.
व्यक्तिगत अभिनय विभागात पुरुष श्रेणीत ‘बापू-गांधी’ नाटकात ‘बापू-गांधी’ची भूमिका साकारणाऱ्या रघुनाथ साकोर्डेकर यांना पहिले पारितोषिक जाहीर झाले. तर ‘होमखण’ नाटकात ‘अॅडमिनिस्ट्रेटर’ ही भूमिका साकारणाऱ्या रामा गावस यांना ५ हजारांचे उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. महिला श्रेणीत ‘काणी तशीच जुनी… पुण’ नाटकात ‘सासाय’ ही भूमिका साकारणाऱ्या दिव्या गावस हिला पहिले पारितोषिक मिळाले. तर ‘बापू-गांधी’ नाटकात ‘भक्ती’ची भूमिका साकारणाऱ्या सुविधा बखले हिला दुसरे पारितोषिक देण्यात आले.