गोव्यात थंडी वाढली, पणजीचे तापमान १९ अंशावर

पुढील सहा दिवस किमान तापमान २० ते २१ अंशांदरम्यान

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th November, 11:07 pm
गोव्यात थंडी वाढली, पणजीचे तापमान १९ अंशावर

पणजी : गेले दोन दिवस राज्यात थंडी वाढली असून, ग्रामीण भागात तिची तीव्रता अधिक जाणवत आहे. गेल्या २४ तासांत पणजी येथील किमान तापमानात १.५ अंशाने घट होऊन ते १९ अंश सेल्सिअस झाले आहे. मुरगावमधील किमान तापमान १९.६ अंश सेल्सिअस राहिले. पुढील सहा दिवस राज्यातील किमान तापमान २० ते २१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

रात्री थंडी, तर दुपारी उन्हाची तीव्रता

सध्या राज्यात रात्री आणि पहाटे तीव्र थंडी जाणवत आहे. पहाटे अनेक ठिकाणी धुके पडत आहे. सकाळी थंडीसह गार वाऱ्याची झुळूक अनुभवायला येत आहे. असे असले तरी दुपारनंतर उन्हाची तीव्रता वाढत आहे. सोमवारी पणजीत कमाल ३२.९ अंश तर मुरगावमध्ये ३३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस दरम्यान राहील.

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तीव्रता

मागील काही वर्षात राज्यात नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या तर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थंडीची तीव्रता वाढत आहे. मात्र जानेवारी महिन्यानंतर थंडी कमी होत आहे. याआधी हवामान खात्याने नोव्हेंबर महिन्यात राज्यातील कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता व्यक्त केली होती. असे असले तरी मागील काही दिवसात किमान तापमान सरासरीपेक्षा १.५ ते २ अंशाने कमी होत आहे.

गोव्यात थंडीच्या लाटेची शक्यता नाही!

हवामान खात्याने मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान येथील काही भागात थंडीच्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र गोव्यात अशा लाटेची शक्यता नाही. सोमवारी मध्य प्रदेश, तेलंगणा येथील काही भागात किमान तापमान सामान्य किमान तापमानापेक्षा ३.१ ते ५ अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाले होते. खात्याने १८ ते २१ नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडू तसेच केरळच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

हेही वाचा